जयपूर येथे परिषद : वसंत लुंगे यांची पत्रपरिषदेत माहितीअमरावती : भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज राष्ट्रीय गव्हर्निंग बॉडी तसेच कौन्सिल सदस्य परिषद ही जयपूर येथे २ व ३ आॅक्टोबरला होत आहे. या परिषदेत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर मंथन करून ते सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती बुधवारी पत्रपरिषदेत भारत कृषक समाजाचे विदर्भाध्यक्ष वसंत लुंगे यांनी दिली.देशभरात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी भारत कृषक समाज विविध आघाड्यांवर काम करीत आहे व जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत विदर्भातून मोठ्या संख्येने शेतकरी सामील होतील, असे वसंत लुंगे यांनी सांगितले. विशेषत: या परिषदेत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत २५ टक्के आरक्षण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत सामावून घेणे तसेच शिक्षणाची व्यवस्था शासनाने करावी, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करावा, पेरेपत्रकानुसार पीकविमा पद्धतीत सुधारणा, ‘नीट’ परीक्षेत शेतकऱ्यांच्या पाल्यांकरिता २५ टक्के जागा आरक्षित करणे आदी शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी निगडीत समस्यांवर मंथन होऊन ठराव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे लुंगे यांनी सांगितले. या परिषदेला देशभरातील भारत कृषक समाजाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रपरिषदेला शशांक देशमुख, दीपक लोखंडे, आशुतोष गुल्हाने, किशोर गुल्हाने, जगदिश कुचे, राजू निंभोरकर, मंगेश जुनधरे, विशाल अढाऊ, राजेंद्र निर्मळ, राजेश मरोडकर आदीे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भारत कृषक समाज परिषदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2016 12:18 AM