अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता आहे. आजमित्तीला तेथे 50 ते 52 वाघ आहेत. मेळघाटातील वाघांची संख्या वाढावी यासाठी ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. दोन वर्ष वयाची ही वाघीण जंगल वास्तव्यात सक्षम आहे. तिचे वय बघता ती मेळघाटात अनेक शावकांना जन्मास घालू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून मेळघाटात वाघांची संख्या वाढणार आहे.
चंद्रपूर-ताडोबात वाघांची संख्या वाढत आहे. वाघांची संख्या वाढल्यामुळे ते ब्रम्हपुरीच्या जंगलासह लगतच्या क्षेत्रातील गाव आणि शेत शिवाराकडे फिरकत आहेत. यात मानव वन्यजीव संघर्ष उद्भवत आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी, ज्या व्याघ्र क्षेत्रात वाघांची संख्या कमी आहे. त्या क्षेत्रात त्यांची संख्या वाढावी म्हणून या वाढत्या, जास्तीच्या वाघांना स्थलांतरित करण्याचे मंथन अभ्यासकांमध्ये सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून प्रथमच ब्रम्हपुरीच्या ई-वन वाघिणीला मेळघाटात पाठविण्यात आले आहे. ब्रम्हपुरीहून ही वाघीण व्हाया गोरेवाडा-नागपूरमार्गे मेळघाटात पोहचली. मेळघाटात दाखल होण्यापूर्वी ती गोरेवाडा प्राणी संग्रहालयात मुक्कामाला होती.
देहरादुनहून नजरकॉलर आयडीसह मेळघाटात दाखल या ई-वन वाघिणीच्या प्रत्येक हालचालीवर, वन्यजीव संस्था देहरादून येथील डॉ. बीलाल हबीब यांच्या मार्गदर्शनात विशेष लक्ष दिले जाणार आहे. याकरिता देहरादूनहून खास तज्ज्ञ मेळघाटात नियुक्त केले जातील. हे तज्ज्ञ सॅटेलाईटच्या मदतीने त्या कॉलर आयडीवरून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणार आहेत. नोंदी घेणार आहेत. यात गुगामल वन्यजीव विभागाचीही जबाबदारी वाढली आहे. कॉलर आयडी असलेली आणि आपले लोकेशन देणारी ही मेळघाटातील पहिली वाघीण ठरली आहे.
राज्यातील वाघांची संख्याराज्यात वाघांची वस्तीस्थाने वाढली आहेत. यात वाघांची संख्याही वाढली आहे. 2006 मध्ये राज्यात 103 वाघ होते. 2010 मध्ये ती 169 वर पोहचली. 2014 मध्ये राज्यात 190 वाघ नोंदल्या गेले. 2018 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर व्हायची असली तरी 2014 नंतर राज्यात वाघांच्या संख्येची स्थिती सुधारली आहे. सन 2014 च्या आकडेवारीत ताडोबातील सर्वाधिक म्हणजे 100 ते 110 वाघ, मेळघाटातील 45 ते 50 वाघ आणि पेंचमधील 25 ते 30 वाघांचा समावेश आहे.
देशातील वाघांची संख्यादेशात 2006 मध्ये 1 हजार 411 वाघ नोंदल्या गेलेत. 2010 मध्ये 1 हजार 706 तर 2014 मध्ये 2 हजार 226 वाघ आढळून आले आहेत. देशपातळीवरही वाघांची संख्या वाढत आहे. वाघ ही भारताची ओळख असून जगातील 3 हजार 890 वाघांपैकी 57 टक्के वाघ भारतात आहेत.मेळघाटच्या जंगलाची दीडशे वाघ सांभाळण्याची क्षमता आहे. मावन व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता, जेथे वाघांची संख्या कमी आहे तेथे वाघांची संख्या वाढविण्याकरिता, ज्या भागात वाघ अधिक आहे, तेथील वाघांचे स्थलांतर करण गरजेचे आहे. - जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती