विरोधी पक्षाची तक्रार : सत्ताधाऱ्यांचा पेचप्रसंग वाढलाअमरावती : जिल्हा परिषदेच्या ६ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत सुमारे २८ कोटींच्या विकासकामांना भाजप सदस्य मनोहर सुने यांनी पालकमंत्र्याकडे केलेल्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त यांनी स्थगिती दिली आहे. याआदेशामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा आदेश धडकल्याने विकासकामांचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.६ जून २०१६ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ३०-५४ या लेखाशिर्षाखाली २२.५० कोटींची तर २५-१५ या दोन लेखाशिर्षांतर्गत सुमारे ६.५० कोटींच्या कामांना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. परंतु निधीचे वाटप समसमान करण्यात आले नसल्याचा आरोप भाजपाच्या सदस्यांनी केला असून हे नियोजन रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली असता त्याची दखल घेण्यात न आल्याने मनोहर सुने यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी गुरूवारी २८ कोटी रूपयांच्या कामांना स्थगीती देण्याचे आदेश दिलेत. तिढा न्यायालयात पोहोचण्याची शक्यताजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजूर विकासकामांच्या नियोजनाला एकमताने मान्यता दिल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीनुसार यात विरोधी सदस्यांना कामाची यादी दाखविली नसून काही कामांना परस्पर मान्यता दिल्याचा आक्षेप केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या तक्रारीवरून आयुक्तांनी दिलेल्या स्थगितीबाबत सत्ताधारी काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आहे.
२८ कोटींच्या नियोजनाला ‘ब्रेक’
By admin | Published: October 03, 2016 12:10 AM