प्रजनन क्षमता वाढली : कुत्र्यांचा हैदोस, चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढअमरावती : शहरात एक, दोन नव्हे तर १० ते १५ अशी मोकाट कुत्र्यांची संख्या गल्ली बोळात फिरत असतानाचे चित्र आहे. वर्षभरापासून कुत्र्यांच्या नसबंदीला ‘ब्रेक’ असल्याने प्रजनन क्षमता वाढीस लागली आहे. तर दुसरीकडे कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राधिकृत संस्था मिळत नसल्याची माहिती हाती आली आहे.पशु, पक्षांची शस्त्रक्रिया करणे अथवा त्यांना पकडण्यासाठी दिल्ली येथील भारतीय जीवजंतू कल्याण मंडळात नोंदणी असलेली सामाजिक संस्थेलाच कंत्राट देण्याची नियमावली आहे. महापालिकेने मोकाट वराह पकडणे, कुत्र्यांना पकडून त्यांची नबंदी करणे यासाठी ११ वेळा निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र ११ वेळा निविदा प्रक्रिया राबवून देखील कुत्र्यांची नसबंदी प्रक्रिया राबविण्यसाठी भारतीय जीवजंतू कल्याण मंडळात नोंदणीकृत एकही एनजीओ पुढे आले नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करणे ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प असल्याने शहरभर हल्ली जागोजागी मोकाट कुत्र्यांची संख्या बेसुमार आहे. एवढेच नव्हे तर मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ देखील झाली आहे. प्राणी संवर्धन कायद्यानुसार कोणत्याही प्राण्याला मारता येत नाही. हीच नियमावली कुत्रे, वराहांसाठी लागू असल्याने मोकाट कुत्र्यांना पकडून केवळ त्यांची नसबंदी करता येते. मात्र भारतीय जीवजंतू कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेली संस्था कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी समोर येत नाही. परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढीस ुलागली आहे, हे वास्तव आहे. महापालिका प्रशासनाकडे मोकाट कुत्रे असल्याबाबतच्या शेकडो तक्रारी असल्या तरी प्राणी संरक्षण कायद्यामुळे या मोकाट कुत्र्यांना हात लावता येत नाही. प्राधिकृत संस्था मिळाल्याशिवाय कुत्र्यांची नसबंदी शक्य नाही. त्यामुळे प्रशासनान ११ वेळा नोंदणीकृत संस्थांसाठी काढलेली निविदा ही निरर्थक ठरल्याचे दिसून येते. शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता हैदोस ही चिंतेची बाब ठरु लागली आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेत असल्याचा विषय यापूर्वी महापालिका सभागृहातही चर्चिल्या गेला. परंतु प्राधिकृत संस्था मिळाल्याशिवाय कुत्र्यांची नसबंदी नाहीच, या उत्तरावर नगरसेवकांना समाधान मानावे लागले आहे.प्राणी संरक्षण कायद्यामुळे मोकाट कुत्रे, वराहांवर थेट कारवाई करता येत नाही. मात्र प्राधिकृत संस्थेला तांत्रिकदृष्ट्या शस्त्रक्रिया करता येते. परंतु अशा संस्था मिळाल्याच नाहीत. मोकाट कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर पशु वैद्यकांची निवड करून नसबंदी करण्याचे प्रस्तावित आहे. - सचिन बोंद्रे, सहायक पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.खासगी डॉक्टरांकडे खर्च अडीच हजार रुपयेशासन नियमानुसार एका कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी ४४५ रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र खासगी डॉक्टरांकडे एका कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी २५०० रुपये खर्च लागत असल्याची माहिती आहे. महापालिका प्रशासनाला कुत्र्यांच्या नसबंदीसाठी एवढा खर्च करणे शक्य नसल्याने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीला तूर्तास लगाम बसल्याचे चित्र आहे.मांसविक्री परिसरात कुत्र्यांचा हैदोसशहरात ज्या परिसरात कोंबडी, बकरा, मासोळी आदी प्राण्यांचे मांसविक्रीची दुकाने आहेत, अशा परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच हॉटेल, बियरबार व ढाबा असलेल्या भागातही मोकाट कुत्र्यांचा ठिय्या आवर्जून दिसत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीला ‘ब्रेक’
By admin | Published: October 30, 2015 12:27 AM