अमरावती : वनपालांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या गैरप्रकार आणि वशिलेबाजीला यंदा ब्रेक लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षकांनी या बदल्यांमध्ये थेट लक्ष घालून पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे बाबूगिरीला तर फाटा बसलाच याउलट वनपरिक्षेत्र अधिकार्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीलादेखील लगाम लावण्यात आला आहे. मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी २२ मे रोजी अमरावती वन वृत्तातील २१ वनपालांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये सरळसेवा वनपाल, पदोन्नत वनपाल या दोघानांही समसमान न्याय देत मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना आणि वनविभाग या चारही शाखांमध्ये ज्या वनपालांचे नियतकालावधी झाला त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. तत्पूर्वी मुख्य वनसंरक्षकांनी २0 वनरक्षकांना वनपालपदी बढतीचे आदेश दिले आहेत. वन विभागात बदली व पदोन्नती म्हटले की बाबूगिरीला सुगीचे दिवस येतात. परंतु यंदा सीसीएफ तिवारी यांनी प्रक्रिया पारदर्शपणे राबवून वनपालांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. स्वत:च्या निगराणीत बदल्यांची प्रक्रिया पार पडल्याने यात हस्तक्षेप करून चिरीमिरी करण्याचे स्वप्न बघणार्या वनपरिक्षेत्र अधिकार्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. वनपरिक्षेत्र अधिकारी बदल्यांमध्ये हस्तक्षेप करून मर्जीतील वनरक्षक, वनपालांना वनपरिक्षेत्रात घेण्यासाठी अर्थकारणाचा वापर करतात. ही बाब सीसीएफच्या निदर्शनात आली. बदल्यांमध्ये होत असलेल्या अर्थकारणाला पूर्णविराम मिळावा यासाठी सीसीएफ तिवारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारीच काय तर उपवनसंरक्षकांचाही हस्तक्षेप खपवून घेतला नाही, हे वास्तव दर्शविले. रिक्त असलेल्या वनपालांच्या जागा पदोन्नतीच्या मार्गाने भरण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये सीसीएफच्या या कार्यप्रणालीवर आनंद पाहावयास मिळत आहे.
वनपालांच्या बदल्यांमध्ये वशिलेबाजीला ब्रेक
By admin | Published: May 27, 2014 12:22 AM