अमरावती : शेतजमिनीच्या वादाबाबत दाखल प्रकरणाच्या कागदपत्रांची नक्कल प्रत देण्यासाठी ४०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका महसूल साहाय्यकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी दुपारी अमरावती तहसील कार्यालयात करण्यात आली.
सारंग विलास पांडे (३३) असे अटक करण्यात आलेल्या महसूल साहाय्यकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांनी शेतजमिनीच्या वादाबाबत उपविभागीय अधिकारी, अमरावती यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाच्या कागदपत्रांची नक्कल प्रत मिळण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, अमरावती येथील अभिलेख कक्षात रीतसर अर्जसुद्धा केला होता. त्यावर महसूल साहाय्यक सारंग पांडे यांनी त्यांना १०० रुपयांची पावती फाडण्यास सांगितले. ती पावती फाडल्यावर सारंग पांडे याने तक्रारकर्ते यांना ५०० रुपयांची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यावर सोमवारी सापळा रचण्यात आला.
तक्रारकर्त्याकडून महसूल साहाय्यक सारंग पांडे याने ४०० रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक विजया पंधरे, युवराज राठोड, मनोज यादव, विनोद धुळे, चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात यांनी केली.