अमरावती : सामूहिक विवाह सोहळ्याचे अनुदान देण्याकरिता पाच हजारांची लाच मागणाऱ्या समाजकल्याण निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. प्राजक्ता दत्तात्रय सोनुने (३४,रा. स्वावलंबी नगर, कठोरा रोड) असे आरोपीचे नाव आहे. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेमार्फत २६ आॅगस्ट २०१२ रोजी ऋणमोचन येथील मुदगलेश्वर महाराज देवस्थानात सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहभागी प्रत्येक जोडप्यामागे संस्थेला शासनाकडून दोन हजार रुपये अनुदान मिळणार होते. अनुदान मिळण्यासाठी संस्थाध्यक्ष भगवंत काळे यांनी विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी संस्थेला २० हजारांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र, उर्वरित अनुदानाचा धनादेश काढण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक प्राजक्ता सोनुने यांनी संस्था अध्यक्षाला पाच हजारांची लाच मागितली. याबाबत संस्थाध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सोमवारी एसीबीच्या पथकाने समाज कल्याण कार्यालयात सापळा रचून तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली. त्यामध्ये आरोपी प्राजक्ता सोनुने यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तिला पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक एम.डी. चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, घटक प्रमुख आर.बी.मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, राजवंत आठवले, जिवन भातकुले, पुजा खांडेकर, पोलीस हवालदार विनोद दाभणे, पोलीस नाईक विक्रम ठाकूर, आशिष इंगोले, सैय्यद ताहेर आली, ज्योती झाडे, चालक शैलेश कडू व अकबर यांचा समावेश आहे. अशाप्रकारच्या भष्ट्राचाराविषयी माहिती मिळाल्यास अॅन्टी करप्शन ब्यूरो कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)
लाचखोर समाजकल्याण निरीक्षक अटकेत
By admin | Published: August 23, 2016 12:52 AM