प्रदीप भाकरे, अमरावती : महाराष्ट्रामध्ये लाचखोरीच्या प्रकरणांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध होऊन संबंधित आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सन २०२३ मध्ये लाचखोरीचे तब्बल ८१२ गुन्हे नोंदविले गेले. मात्र, त्या तुलनेत गतवर्षी केवळ २१ प्रकरणांतील २८ लाचखोरांनाच शिक्षा झाली.
राज्यात सन २०२० नंतर एकीकडे लाचखोरीचे गुन्हे वाढत असताना, दुसरीकडे प्रलंबित खटल्यांची संख्या देखील वाढत आहे. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नाशिक असे विभाग आहेत. गेल्यावर्षी या आठ विभागांत लाचखोरी, अपसंपदा व इतर भ्रष्टाचाराचे तब्बल ८१२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या तुुलनेत केवळ २१ प्रकरणांतील लाचखोरी सिद्ध झाली. २८ आरोपींना शिक्षा झाली. त्याचवेळी संपूर्ण राज्यात ‘एसीबी’ची ५७१ प्रकरणे तपासावर प्रलंबित आहेत. तर, ५३ प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेत. तर तब्बल १५७ प्रकरणे सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अभियोग पूर्व मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
या विभागातील लाचखोरांना शिक्षा :
सन २०२३ मध्ये लाचखोरीची २१ प्रकरणे न्यायालयात सिद्ध झाली. त्यात २८ लाचखोरांना शिक्षा ठोठावण्यात आली. दोषसिद्ध गुन्ह्यातील आरोपींना १२ लाख ६४ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दोषसिद्ध लाचखोर आरोपींमध्ये महसूल, भूमी अभिलेख व नोंदणी विभागांतील पाच प्रकरणे, वनविभागातील तीन तर पोलिस व जिल्हा परिषदेतील प्रत्येकी दोन प्रकरणांचा समावेश आहे. तर नगरविकास, महावितरण, विधी व न्याय, पाटबंधारे, आरोग्य, शिक्षण, एमआयडीसी, आरटीओ व ग्रामविकास विभागातील एका प्रकरणाचा समावेश आहे.
नाशिक विभागात सर्वाधिक गुन्हे :
‘एलसीबी’ने आठ परिक्षेत्रात वर्षभरात ७९५ सापळे, १२ अपसंपदा व अन्य भ्रष्टाचार ५, अशा एकूण ८१२ प्रकरणी गुन्हे नोंदविले. यात नांदेड ६०, ठाणे १०३, छत्रपती संभाजीनगर १२६, पुणे १५५, नाशिक सर्वाधिक १६४, नागपूर ७५, अमरावती ८७ व मुंबई परिक्षेत्रात ४२ गुन्हे नोंदविले गेले.
वर्षनिहाय सापळा व अपसंपदा एफआयआर:
वर्ष : सापळा : अपसंपदा : अन्य भ्रष्टाचार२०१९ : ८६६ : २० : ५२०२० : ६३० : १२ : २१२०२१ : ७६४ : ७ : २
२०२२ : ७२८ : १२ : ९
२०२३ : ७९५: १२ : ५
‘ती’ दोषसिद्ध प्रकरणे २००३ पासूनची :
सन २०२३ मध्ये ज्या २१ प्रकरणांचा निकाल लागला. ज्यात लाचखोरांना कारावास, सक्तमजुरी व दंडाची शिक्षा लागली. त्या प्रकरणांत सन २००३, २००६, २०१२, २०२३, २०१४, २०१५, २०१६ व २०१७ या वर्षांत नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सोलापूर येथे २००३ साली नोंदविल्या गेलेल्या लाचखोरीच्या गुन्ह्यात संबंधित दोघांना सन २०१६ मध्ये निर्दोष मुक्त करण्यात आले होते. मात्र, अपिलात एप्रिल २०२३ मध्ये त्या दोघांना सहा महिने साधी कैद व दंड सुनावण्यात आला.