अमरावती : यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना एक नवीन ब्रिज कोर्स शिकावा लागणार आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग हा ब्रिज कोर्स तयार करीत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून राज्यभरातील शाळा बंद आहेत. दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. त्यात कोरोनासारखा जीवघेणा आजार त्यांनी पाहिला किंवा अनुभवला आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता, यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग दिल्या जाणार आहेत. या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमांसाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम ठरवणार असल्याचे राज्य परिषदेने स्पष्ट केले. विदर्भ वगळता अन्य ठिकाणी १५ जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी, या दृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
बॉक्स
मुले शैक्षणिक प्रवाहापासून दूर
जवळपास दीड वर्षाच्या लॉकडाऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. कारण त्यांना कुठल्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नव्हती. त्यामुळे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचले नाही. त्यामुळे ती मुले प्रवाहापासून दूर आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी हा कोर्स महत्त्वाचा असल्याचे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी राजेश सावकर यांनी सांगितले.