अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांनी ६ डिसेंबर रोजी अमरावतीच्या चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून महामानवाच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
.....
निवडणूक आचारसंहिता आली संपुष्टात
अमरावती : विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता ८ डिसेंबर रोजी संपुष्टात आली. १ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. आता गॅझेट नोटिफिकेशन प्रकाशित केल्यानंतर या निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
.....
११ डिसेंबरला पुन्हा मतदार यादीसाठी संधी
अमरावती : आगामी ११ व १२ डिसेंबरला पुन्हा मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. या यादीत नाव नोंदविण्यासाठीची विशेष अभियान देशभर सुरू आहे. ५ व ६ डिसेंबरला काही शाळांमध्येशिबिरे आयोजित करून नावे नोंदवून घेण्यासाठी अर्ज भरून घेतले. आता शुक्रवार, शनिवारी हे अभियान राबविले जाणार आहे.
.........
शेतकऱ्यांना माती परिक्षणाची धडे
अमरावती : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मूद आरोग्य पत्रिका पथदर्शी प्रकल्प अंतर्गत दहीगाव रेचा येथे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शेतकर्यांना माती परीक्षणाचे धडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.
..........
आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले
अमरावती : कांदा आता ४० रुपयांवर आला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस व या महिन्यात कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. आगामी काळात आणखी दर उतरणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
..........
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निदर्शने
अमरावती : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पंचवटी चौकात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्राच्या परिसरात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रवीण मोहोड, रवि पडोळे, मंगेश फाटे, निखिल बोके, सुधाकर पांडे, पुरुषोत्तम बनसोड, उमेश चौकडे, नंदकिशोर शेरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
.....
शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्या
अमरावती: शाळा व महाविद्यालये सुरू केल्यानंतर आता खासगी शिकवणी वर्गांना परवानगी द्यावी, अशी मागणी कोचिंग क्लासेस टीचर फेडरेशन या सामाजिक संघटनेने केली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना भेटून याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी फोरमचे अध्यक्ष बंडोपंत भुयार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.