लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीर्घ कालावधीनंतर यंदा १६ डिसेंबरला ‘४६ पी/विरटेनन’ नावाचा धूमकेतु पृथ्वीच्या नजीक येत आहे. पृथ्वीजवळून जात असताना त्याच्या अवलोकनाची संधी अमरावतीकरांना प्राप्त होत आहे. हा धूमकेतु साध्या डोळ्यांनी दिसेल; मात्र अंधाऱ्या जागेतून याचे निरीक्षण करावे लागणार आहे.अमेरिकेचे कार्ल अलवर विरटेनन या ३७ वर्षीय शास्त्रज्ञाने कॅलिफोर्निया येथील लीक वेधशाळेतून १९४८ मध्ये हा धूमकेतु शोधला आहे. सूर्याभोवती एक फेरी मारायला त्याला साडेपाच ते साडेसात वर्षे लागतात. म्हणजेच हा धूमकेतु शोधल्यापासून यंदाची त्याची अकरावी फेरी आहे. २०० वर्षांपूर्वीच्या कालावधीमधले धूमकेतु हे प्लुटो ग्रहाच्या पलीकडील ‘कायपर’ नावाच्या लघुग्रहाच्या पट्ट्यातून येतात. त्यापूर्वीच्या कालावधीतील धूमकेतु हे सूर्यमालेच्या शेवटी एक प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘उर्ट’ नावाच्या ढगातून येतात. अत्यंत अल्प काळाचा फेरा असलेले धूमकेतु हे गुरू आणि मंगळ ग्रहांच्या मध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्ट्यातून येतात. पुढे हे धूमकेतु गुरू ग्रहाजवळून जात असल्याने त्यांना गुरू ग्रहकाळातील धूमकेतु म्हणतात. ४६ पी/विरटेनन हा धूमकेतु अशाच गुरू ग्रहकाळातील आहे.सद्यस्थितीत ‘४६ पी/विरटेनन’ हा धूमकेतु ‘बक’ (सेटस) या तारकासमूहात आहे. तो प्रतिसेंकद ३७ किमी गतीने सूर्याकडे येत आहे. यंदा तो १६ डिसेंबरला पृथ्वीपासून १ कोटी १५ लक्ष ८६ हजार ३५० किमी अंतरावर राहील. केवळ एक किमी व्यास असलेला हा धूमकेतु १६ डिसेंबरला पूर्व बाजूला रात्री ९ वाजता रोहिणी नक्षत्राच्या ताऱ्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला कृतिका नक्षत्राजवळ पाहता येणार आहे. धूमकेतु हे बर्फ, धूळ व वायू यांचे बनलेले असतात. ते जसजसे सूर्याजवळ येतात, तसतसा वायू व धूळ प्रसरण पावून लाखो किमी लांब अशी शेपटी तयार होते, असे मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने म्हणाले.मिथून तारकासमूहातून उल्कावर्षावयंदा १३ ते १९ डिसेंबर या काळात मिथून तारकासमूहातून पहाटे ३ ते ५ या काळात उल्कावर्षाव होईल. एका तासात साधारणपणे ८० उल्का पडतील. यासाठी ३२०० क्रमांकाचा फेथन हा लघुग्रह कारणीभूत आहे. उल्केचा रंग पिवळसर असेल. लघुग्रह सूर्याला फेरी घालून जात असताना त्याचा काही भाग मोकळा होतो. तोच हा उल्कावर्षाव अर्थात लघुग्रहाचे अवशेष होय. पृथ्वीवर त्या घनरूप अवस्थेत येतात तेव्हा त्यास अशनी म्हणतात. याला ‘तारा तुटला’ म्हटले जाते. याविषयी अनेक अंधश्रद्धा असल्या तरी त्याला खगोलशास्त्रात आधार नाही. घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेर अंधारात जाऊन अवलोकन करावे, असे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर म्हणाले.आकाशात एकाच वेळी तीन ते चार धूमकेतु नेहमीच असतात. मात्र, ते पृथ्वीपासून लांब असल्यामुळे साध्या डोळ्यांनी दिसत नाही. धूमकेतु व दुष्काळाचा कुठलाच संबंध नाही. नागरिकांनी अंधश्रद्धा झुगारून धूमकेतुचे निरीक्षण करावे.- रवींद्र खराबेखगोलशास्त्र शाखाप्रमुखमराठी विज्ञान परिषद
१६ डिसेंबरला दिसणार तेजस्वी धूमकेतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:01 PM
दीर्घ कालावधीनंतर यंदा १६ डिसेंबरला ‘४६ पी/विरटेनन’ नावाचा धूमकेतु पृथ्वीच्या नजीक येत आहे. पृथ्वीजवळून जात असताना त्याच्या अवलोकनाची संधी अमरावतीकरांना प्राप्त होत आहे. हा धूमकेतु साध्या डोळ्यांनी दिसेल; मात्र अंधाऱ्या जागेतून याचे निरीक्षण करावे लागणार आहे.
ठळक मुद्देखगोलीय घटना : खगोल अभ्यासकांसह सर्वांनाच अवलोकनाची संधी