अमरावती : मागील तीन वर्षात मेळघाटातील कुपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून, यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे याचा फायदा होत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी तीव्र कुपोषित बालकांची संख्या ४५६ होती ती आता २३५ वर आलेली आहे. त्याचबरोबर गृहप्रसूतीचे प्रमाण १६ वरून ६ टक्क्यांवर आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
मेळघाटामध्ये विविध कारणांमुळे कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे हे जरी सत्य असेल तरी मागील तीन वर्षांपासून महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग आपल्या स्तरावर विविध योजना, उपक्रम, अभियान राबवून कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीईओ अविश्यांत पंडा यांनी गतवर्षी सुरू केलेले मिशन २८ या अंतर्गत नवजात बालके आणि गरोदर स्त्रिया यांच्या घरी अंगणवाडीसेविका आणि आशावर्कर दररोज भेटी देत आहेत. आजारी बालके आणि जोखमींच्या माता याबाबत तात्काळ वरिष्ठांना पुरविली जात आहे. त्यामुळे कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यामध्ये आणि गृहप्रसूतीचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश आले आहे.
यावर्षी पेसाचा निधी वापरून चार हजार कमी वजनांच्या बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू केले आहेत. कमी वजनांची बालके तीव्र कुपोषित होऊ नये म्हणून ही पूर्वतयारी आहे. महाराष्ट्रातील अमरावती हा केवळ एकमेव जिल्हा आहे, जो अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहे. ज्या बालकात ग्राम बालविकास केंद्रात ठेवूनही सुधारणा होत नाही, अशा बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बाल उपचार केंद्रात दाखल केले जात आहे. यासाठी लागणारा निधी ॲडव्हान्स म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्याबाबत आदेश सीईओंनी दिले आहेत.
ग्राम बालविकास केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त बालकांना कुपोषणमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर बाल उपचार केंद्राला ॲडव्हान्स निधी दिला असून, तिथेसुद्धा बालकांवर उपचार केले जात आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न आहे. - अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अमरावती