जरूड : शासनाकडून योजनांचा लाभ मिळतोय म्हणून केवळ बांधकाम कामगारांची नोंदणी करणाऱ्या एजंटांचा वरूड तालुक्यात सुळसुळाट वाढला आहे. ग्रामीण भागातील अनेक कामगार वरूड येथे नोंदणी करण्यासाठी येत असून, दोन हजार रुपये द्या आणि बांधकाम कामगार व्हा, असा छुपा फतवाच काढण्यात आला आहे. यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणात लूट होऊन गैरसोय होत आहे.
तालुक्यातील वाठोडा चांदस, चिंचरगव्हाण या परिसरात काही लोक इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना अंतर्गत साहित्य आणून देतो, असे म्हणून त्यांची नोंदणी करण्याचे दोन हजार रुपये रोख स्वरूपात गोरगरीब जनतेपासून घेत आहेत. महाराष्ट्र शासन अंतर्गत इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेत लाभार्थीने नोंदणी केल्यानंतर त्याला कामगार म्हणून काही लाभ मिळतील. त्याचा फायदा घेत गोरगरीब जनतेची लुबाडणूक करण्यासाठी काही दलाल सक्रिय झाले आहेत.
सदर योजनेत नोंदणी करायला व साहित्यासाठी कसलाच स्वरूपाचा खर्च येत नाही. तरी दलाल लोकांनी आतापर्यंत शंभर लोकांची लुबाडणूक केली असल्याचे निदर्शनास येत आहे. एजंटांमार्फत भ्रष्टाचार सुरू असल्याचा कामगारांनी आरोप केला आहे. एजंटांकडून पैसे मोजलेल्यांचीच नोंदणी होत असल्याने खऱ्या गरजू कामगारांना याचा लाभ मिळत नसून, त्यांची गैरसोय होत आहे. मात्र, यासाठी अधिकाऱ्यांना वारंवार भेटूनदेखील अधिकारी-कर्मचारी या एजंटांना खतपाणी घालत आहेत. नोंदणीसाठी कामगारांकडून दोन हजार रुपयांप्रमाणे वसुली केली जात आहेत. दररोज येणाऱ्या ग्रामीण भागातील कामगारांना मात्र दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे.