गहिवरला गावही : राखी पौर्णिमेला साहिलच्या बहिणींचे फाटले काळीजगणेश देशमुख अमरावती'साहिल गेला,' यावर अजूनही विश्वासच नसलेल्या त्याच्या चारही बहिणींनी साहिलच्या प्रतिमेसमोर राखी ठेवून त्याची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. सर्वंकष प्रयत्न करूनही आवरू न शकल्याने दाटून आलेला भावनातिरेक व्यक्त झाला नि डायरे परिवार पुन्हा वेदनेच्या सागरात बुडाला. साहिलला सख्खी बहीण नसली तरी त्याच्या चारही चुलत बहिणी त्याच्यासाठी सख्ख्याच होत्या. त्यातील श्रावणी ही सर्वांत लहान. 'केजी'मध्ये शिकणारी. साहिलच्या खूप खूप लाडाची. सप्टेबरच्या चार तारखेला तिचा जन्मदिवस. तिचे वास्तव्य आकोटचे. राखीपौर्णिमेला सर्वच बहिणी एकत्र येणार असल्याने श्रावणीचा जन्मदिवसही त्यानिमित्ताने माहुलीत साजरा करण्याचे साहिलने ठरविले होते. साहिलची ही कल्पना कुटुंबातील सर्वांनी उचलून धरली. श्रावणीवर आनंदाच्या सर्व छटांची बरसात करण्यासाठीची तयारी साहिलने आरंभलीही होती. चिमुकल्या बहिणीचे आभाळाएवढे कौतुक 'साहिल दादा'ला करायचे होते. श्रावणीच्या जन्मदिन उत्सवाला काय काय करणार याचा पाढाच साहिल वाचून दाखवित होता. श्रावणीच्या वडिलांनीही सुट्यांचे नियोजन करून माहुलीत मुक्कामी येण्याचे ठरविले. श्रावणी आली. श्रावणी आली, पण साहिल गेलाअमरावती : चारही बहिणी एकत्र आल्या, राखीपौर्णिमाही आली; पण सर्वांना बोलविणारा साहिलच असा अचानक निघून गेला. रक्षाबंधनाच्या दिवशीचा एकेक मिनिट या चारही बहिणींसाठी एकेका वर्षाप्रमाणे जड होता. धरणी फाटावी तसे साहिलच्या कुटुंबीयांचेही काळीज फाटले आहे. त्या असह््य वेदनांना शमविता येईल, असा मलम या भूतलावर नाहीच मुळी! साहिलला नेणाऱ्या हे विधात्या, तूच आता त्याच्या कुटुंबीयांना विरह सहन करण्याची शक्ती दे, ही प्रार्थनाच केवळ जिल्हावासी करू शकतात.
बंधुराया, फोटोतूनच बांधते तुला राखी रे !
By admin | Published: August 30, 2015 12:01 AM