यंत्रणेने झुगारला दबाव : बदली प्रक्रियेला ब्रेकअमरावती : प्रशासकीय कामकाजासह अन्य सर्वच कामांमध्ये नाक खुपसणाऱ्या महापालिकेतील काही भाऊ आणि दादांना आता बदल्यांनी भुरळ घातली आहे. शिक्षकांच्या मनाजोग्या बदल्या करुन किंवा झालेली बदली रद्द करुनही मलाई चाखता येत असल्याचा साक्षात्कार काही बहाद्दरांना झाला आहे. त्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मात्र दबावाला बळी न पडता प्रशासनाने बदली प्रक्रियेला सप्टेंबर अखेरपर्यंत पुर्णविराम दिला आहे.महापालिकेकडे ६७ शाळा असून त्यातील ६२ प्राथमिक आणि ५ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. सुमारे ५५ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी तात्पुरती पदोन्नती देण्यात आली. तर अन्य शिक्षकांच्या महापालिका क्षेत्रातच बदल्या करण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी एकाच ठिकाणी अनेक वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या अन्यत्र बदल्या केल्या. महापालिका क्षेत्रातच बदल्या होऊन सुध्दा अनेकांनी नकारघंटा वाजविली. मग त्या बदल्या रद्द करुन घेण्यासाठी शिक्षणाधिकारी, अतिरिक्त आयुक्तांसह आयुक्तांचे उंबरठे झिजविले. मुख्याध्यापकपदाचा पदभार घेण्यास उत्सूक नसलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शिष्टाई अयशस्वी होत असल्याचे पाहून अनेकांनी मनायोग्य बदल्यांचा प्रश्न दादा आणि भाऊंच्या कानावर घातला. त्यांचे मन या विनवणीने द्रवले. भाऊ, आम्ही तुमचे मतदार आहोत. शेटे आणि डेंगरे ऐकायलाच तयार नाहीत. बदलीचे तेवढे बघा ना, अशा शब्दात आर्जव करण्यात आली. नंतर भाऊ - दादांनी हा प्रश्न प्रतिष्टेचा केला. त्यासाठी कूणी कॅबिन गाठली तर कुणी भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधितांना थेट आदेश केलेत. थेट भाऊ-दादांनीच बदलीबाबत रदबदली केल्याने नियमाच्या चौकटीत बसून शक्य असेल त्याबाबत मदतीचा हातही दिला. मात्र जी बदली शक्यच नाही तेथे त्यांना स्पष्टपणे नकार देण्यात आला. त्यावेळी या दादा -भाऊंची सबंधित अधिकाऱ्यांशी तू तू मै मै सुध्दा झाली. बदल्यांच्या एक दोन प्रकरणात तर नव्या अधिकाऱ्यांना अक्षरश: धमकावले. गुडेवारांचा कार्यकाळ वगळता दादा -भाऊंचा शब्द झुगारण्याची कुणाचीही बिशाद नसल्याने आतापर्यंत बदल्या असो वा पदोन्नत्त्या वा एखाद्या पदाचा पदभार असो साऱ्याच प्रकरणांमध्ये यांचीच शिष्टाई. पहिल्यांदाच नकाराला सामोरे जाताना दादा -भाऊंचा तिळपापड झाला. यंत्रणेचे आम्हीच शिलेदार आहोत, असेही बजावण्यात आले. मात्र, दबावाला भीक न घालता बदली प्रक्रिया पुर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले. या प्रकरणांची पालिकेत खमंग चर्चा असून दादा-भाऊंनी यात पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळा निरीक्षकांच्या नेमणुकीसाठी दबावतंत्रबुधवाऱ्यातील मनपाच्या एका शाळेतील माध्यमिक शिक्षकाला शाळा निरिक्षकपदाचे वेध लागलेत. तो पदभार मिळाल्यानंतर वेतनात भर पडत नसली तरी रुतबा वाढतो, असा त्यामागे होरा आहे. मग त्या शिक्षकाने त्यासाठी भाऊंना गळ घातली. त्याचाच एक भाग म्हणून भाऊंनी अतिरिक्त आयुक्तांचे दालन गाठले. मात्र भाऊंचा प्रस्ताव नाकारण्यात आला. भाऊ रिक्तहस्ते परतल्याने त्या इच्छुकाचादेखिल हिरमोड झाला.
भाऊ-दादांना बदल्यांची भुरळ !
By admin | Published: September 18, 2016 12:24 AM