पोलीस सूत्रानुसार, अमन किशोर खंडारे (२०, रा. जेवड नगर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी डिक्याव ऊर्फ अभिषेक ऊर्फ मामू राकेश ऊर्फ रमेश डिक्याव (२१, रा. पोस्टमन कॉलनी, जेवड नगर) व एका अल्पवयीनाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिसांनी डिक्यावला घटनेनंतर जेवड नगरातून अर्धा तासात अटक केली. तर अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
डिक्यावच्या अल्पवयीन भावासोबत मृत अमनचा क्षुल्लक कारणावरून
वाद झाला. त्यानंतर अमनने अल्पवयीनाच्या कानशिलात लगावली. अल्पवयीनाने ही बाब मोठा भाऊ डिक्यावला सांगितली. यानंतर अल्पवयीनाजवळ आधीच असलेला चाकू डिक्याव घेऊन घटनास्थळावर आला. त्याने अमनवर चाकू हल्ला चढविला. अमन आपला जीव वाचविण्याकरिता रस्त्याने पडत होता. तर डिक्याव त्याच्या पाठीवर चाकूने घाव घालत होता. त्यानंतर डिक्यावने तेथून पळ काढला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेल्या अमनला नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले; परंतु येथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटना गंभीर असल्याने पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ, राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यानंतर तपासाची सूत्रे फिरवून तातडीने अर्ध्या तासातच डिक्यावला अटक तर अल्पवयीन आरोपीसह ताब्यात घेतले. डिक्याव हा जेवड नगरनजीकच असलेल्या पोस्टमन कॉलनीत राहत असून, तो स्विपरचे काम करतो. डिक्यावला पीसीआर मिळण्याकरिता शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.