अर्थसंकल्पाची लगबग : महापालिकेत रविवारी पुन्हा बैठकअमरावती : सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे ७४०.८३ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांच्यावतीने शुक्रवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आले. मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांनी सभापतींसमोर अंदाजपत्रक ठेवले. त्या अंदाजपत्रकामध्ये आता सभापती तुषार भारतीय काही बदल आणि सुधारणा सुचवतील. त्यानंतर हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी आमसभेत ठेवण्यात येईल. प्रशासनाच्यावतीने बनविण्यात आलेल्या ७४०.८३ कोटींच्या अंदाजपत्रकात ३४१.५० कोटी महसुली उत्पन्न, ३७६.८४ कोटी भांडवली उत्पन्न आणि २२.४९ कोटी असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न दाखविण्यात आले आहे. गतवर्षी ८९५ कोटींच्या अर्थसंकल्पाला आमसभेत मंजुरी मिळाली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना प्रशासनाने वस्तुस्थितीदर्शक अर्थसंकल्प मांडण्यावर भर दिला असून त्याचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात उमटले आहे. महापालिकेत ठणठणाट असताना व्यापक आणि संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रशासनासह स्थायी समिती सभापतींनाही मोठी कसरत करावी लागेल. दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून अंदाजपत्रकाची लगबग सुरु होते. मात्र, यंदा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम असल्याने महापौर निवडीनंतर प्रक्रियेला वेग देण्यात आला. आयुक्त हेमंत पवार यांनी जातीने लक्ष घालून हा अर्थसंकल्प अधिक वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीनुरुप बनविण्यावर भर दिला. त्यासाठी बैठकांचा रतीब घातला. मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांनी सर्वच विभागप्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या विभागातील तरतूद मागवून घेतली. उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत आणि शासनाद्वारे प्राप्त अनुदानाची गोळाबेरीज करून आयुक्त आणि मुख्य लेखाधिकाऱ्यांनी संतुलित अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यावर शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून स्थायी समितीसमोर मंथन करण्यात आले. यावेळी आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, सर्व सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि स्थायीचे सदस्य उपस्थित होते. भारतीय यांनी जमाखर्चाचा ताळेबंद घेतल्यानंतर ही बैठक स्थगित केली. स्थगित बैठक आता रविवारी दुपारी १ वाजता होणार आहे.मालमत्ताकरावर अवलंबून असलेला महापालिकेचा डोलारा बघता अन्य स्त्रोत विकसित करण्याकडे प्रशासनाने लक्ष पुरविले आहे.मालमत्ता कर, जाहिरात कर, व्यापारी संकुलातून येणारे उत्पन्न, बाजारपेठ व दुकांनापासून मिळणारे उत्पन्न, याशिवाय बांधकाम परवानगी आणि भूखंड विक्रीतून प्राप्त होणाऱ्या विकासशुल्कावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्थायी समिती दरवर्षी महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चात वाढ सुचवित असते. यंदा भारतीय त्यात नेमके काय बदल किंवा सुधारणा सुचवितात, हे रविवारी स्पष्ट होईल. दरम्यान याच बैठकीत क्रीडा विभागाचे शिक्षण विभागात विलिनीकरण करण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले आहे. याबाबत काय निर्णय होतो, याबाबतही औत्सुक्याचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)३१ ला आमसभेसमोर ? दरवर्षी ३१ मार्चला महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष सभेत सभागृहासमोर मांडला जातो. मागील काही वर्षांपासून ही परंपराच झाली आहे. त्यामुळे नवनियुक्त सभापती तुषार भारतीय हे ३१ मार्चला अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा जोपासतात की कसे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
७४० कोटींचे अंदाजपत्रक
By admin | Published: March 25, 2017 12:13 AM