तिवसा (अमरावती) : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे गुरुवारी रेड्यांंची झुंज चांगलीच रंगली. ही झुंज पाहण्यासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या स्पर्धेसाठी ३० हून अधिक रेडे दाखल झाले होते.
न्यायालयाने पशुहिंसा कायद्यांतर्गत प्राण्यांच्या झुंजींवर, त्यांच्या खेळावर बंदी आणली असली तरी ग्रामीण भागात आजही अशा स्पर्धांचे मोठे आकर्षण आहे. तळेगाव ठाकूर या गावातील पिंगळाई नदीच्या नदीपात्रात रेड्यांची झुंज रंगली होती. झुंजीदरम्यान रेडे मैदान सोडून पळू नये, यासाठी आयोजकांनी चोख व्यवस्था केली होती. दोन्ही बाजूला मैदानात काटेरी कुंपण घालण्यात आले होते.
दुपारी १२ ते ६ वाजेपर्यंत ही स्पर्धा चालली. विजयी रेड्यासाठी प्रथम बक्षीस १५ हजार रुपये, तर दुसरे बक्षीस सात हजार रुपये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे.