अमरावती : भानखेडा मार्गालगतच्या छत्रीतलाव परिसरात रविवारी बिबट्याने म्हैस फस्त केल्याची बाब उघडकीस आली आहे. ही म्हैस प्रेमकुमार यादव यांच्या मालकीची होती. सीमेवर बिबट्याचे वास्तव्य असल्याचे या घटनेवरून सिद्ध होते. शहराच्या सीमेलगत बिबट्याचे वास्तव्य असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. बिबट अनेकदा वावरताना नागरिकांच्या निदर्शनास आले. विशेषत: विद्यापीठ, छत्रीतलाव, वडाळीच्या जंगलात बिबट असल्याचा दुजोरा वनविभागाने सुद्धा यापूर्वी दिला आहे. मात्र, रविवारी उशिरा सायंकाळी भानखेडा मार्गालगत यादव यांच्या हेटीतून (गोठा) बिबट्याने म्हशीवर हल्ला करून ती नजीकच्या एका शेतात फरफटत नेली. शेतात म्हशीचे काही अवयव वनविभागाच्या हाती लागले. बिबट्याने म्हैस फस्त केल्याबाबतचा पंचनामा वनविभागाने केला आहे. पशू वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पंचनाम्यानंतर प्रेमकुमार यादव यांना म्हशीच्या नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे. म्हैस गोठ्यातून बिबट्याने नेल्याची तक्रार प्रेमकुमार यादव यांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे नोंदविली े. बिबट्याने म्हैस फस्त केल्याचा पंचनामा कॅमेराबद्ध करण्यात आला आहे.
बिबट्याने फस्त केली म्हैस
By admin | Published: January 19, 2015 11:58 PM