अमरावती : यंदाच्या खरिपासाठी खतांची टंचाई नाही. मात्र, युरियाचा तुटवडा पडू नये, याकरिता दीड लाख मेट्रिक टन बफर स्टॉक केलेला आहे. याव्यतिरिक्त डीएपीची दरवाढ न करता मूळ दर कायम ठेवण्याची विनंती केंद्र शासनाला केल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
जिल्ह्याला विदर्भाचे सोयाबीन, कपाशी व कडधान्य हे प्रमुख पीक आहेत. यंदा सोयाबीन बियाण्यांचा पुरेसा साठा आहे. याचसोबत उगवण संदर्भात तक्रार उद्भवू नये, शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे यासाठी सातत्याने जागृती करण्यात आलेली आहे. यासाठी मायक्रो प्लॅनिंगदेखील केलेले आहे. महाबीजचा पुरवठा वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याची माहिती. ना. भुसे यांनी दिली.
यंदाचे वर्ष कृषी विभागाद्वारा ‘उत्पादकता वर्ष’ म्हणून साजरे करीत आहोत. याचसोबत रासायनिक खतांची १० टक्के बचत व्हावी, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रीय खतांचा पर्यायदेखील उपलब्ध करण्यात आलेला आहे. ‘सिंगल पेज ॲप्लिकेशन’ योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात ३० टक्के लाभार्थी शेतकरी महिला राहणार आहे. आदिवासी, मागासवर्गीय शेतकऱ्यांनाही योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाने सुमोटो ड्राईव्ह राबविला आहे. अपघात विमा योजनांमध्ये कृषी विभागाद्वारा कागदपत्राची पूर्तता केली जात असल्याचे ना. भुसे म्हणाले.
बॉक्स
पीक विमा भरपाईसाठी बीड पॅटर्न
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याकरिता ‘बीड पॅटर्न’ राबवावा, अशी मागणी केंद्राकडे केल्याचे कृषिमंत्री म्हणाले. शेतकरी हिस्सा, केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा यामधून कंपनीने १० टक्के प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा घेऊन उर्वरित रकमेतून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशाप्रकारचा हा पॅटर्न असल्याचे ते म्हणाले.
बॉक्स
‘पोखरा’मध्ये दोन महिन्यांत रिझल्ट
‘पोखरा’ योजनेचा आपण स्वत: दोन वेळा आढावा घेतला असताना योजनेत गती नसल्याबाबत संबंधित यंत्रणेला जाब विचारला. या योजनेचा लाभ जलदगतीने मिळावा यासाठी या बैठकीत सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे. येत्या दोन महिन्यात तुम्हाला रिझल्ट दिसतील, अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.