पान २
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार
आसेगाव पूर्णा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अनागोंदी कारभारामुळे रुग्णांसह नातेवाईक त्रस्त झाले आहेत. आरोग्य सुविधांवर लक्षावधी रुपये खर्च करण्याचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येत आहे. ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याची प्रचिती आसेगाव पूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थितीवरून येते.
आसेगावसह लगतच्या जवळपास २६ गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या या केंद्रात रोज शेकडो रुग्ण येतात. परंतु, ओपीडीशिवाय येथे अन्य कुठल्याही सुविधा नाहीत. किरकोळ आजारी रुग्णांनासुद्धा थेट जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. यामुळे येथे रुग्णालय असूनसुद्धा ते नसल्यातच जमा झाले आहे.
बॉक्स
सुविधा आहेत कुठे?
आरोग्य केंद्रात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नसून, पिण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. शौचालयाचे दारच नव्हे, इतर खोल्यांच्या दारांचीही अवस्था बिकट झाली आहे. रुग्णांसाठी असलेला वॉटर कूलर शोभेची वस्तू ठरला आहे. रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा वावर असतो.
इमारतीच्या भिंतींना तडा
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. स्लॅबला पावसाळ्यात गळती लागते, तर भिंतींना छिद्रे पडली आहेत. इमारत शिकस्त झाल्याने कुठल्याही क्षणी विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे दाखल होणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जिवास त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कारभाराबाबत अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. जीवितहानी झाल्यास अधिकारीच जबाबदार असतील.
- रूचा वाटाणे, सदस्य, आरोग्य कल्याण समिती
कोट
सध्या येथील मुख्य आरोग्य अधिकारी सुटीवर असल्यामुळे तात्पुरता पदभार घेतला आहे. त्यामुळे मला याबद्दल काहीही माहिती नाही.
- रश्मी चव्हाण, प्रभारी आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आसेगाव पूर्णा
-------------