मोहन राऊत
धामणगाव रेल्वे (अमरावती) : आई-बाबा, मी लवकर परत येते, असे म्हणत राधिकाने आई-वडिलांचा निरोप घेतला. पुण्यात एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर सोमवारी शैक्षणिक सत्र सुरू होणार होते. त्यामुळे तेथे उपस्थित राहण्यासाठी राधिका निघाली. मात्र, ती आई-वडिलांशी शेवटचे बोलतेय, हे तिच्या गावीही नव्हते. कारण काही तासातच तिच्या ट्रॅव्हल्सला सिंदखेड राजानजीक आगीने वेढले. यात राधिकाचादेखील कोळसा झाला. इकडे ही वार्ता धडकताच तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू होता.
सिंदखेड राजानजीक नागपूरहून पुण्याला निघालेल्या खासगी ट्रॅव्हल्सने पेट घेतला. यात ३३ पैकी २५ प्रवासी भाजून मृत्युमुखी पडले. यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव (मंगरूळ) येथील मूळ रहिवासी असलेली राधिका महेश खडसे (२२) ही तरुणीदेखील होती. हे कुटुंब मुलींच्या शिक्षणासाठी वर्धेला स्थायिक झाले आहे. राधिका ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. वर्धा येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अव्वल ठरल्यानंतर तिने पुण्यात डी.फार्म. केले. त्यानंतर घरी आलेल्या राधिकाचे चांगले कोडकौतुक झाले. पुढच्या शिक्षणासाठी पुन्हा पुण्याची वाट धरत तिने तेथील रिम्स महाविद्यालयात प्रवेश मिळविला होता. एमबीएनंतर पीएचडी करण्याचे तिचे ध्येय होते.
सोमवारपासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्याने ती वर्धेहून ज्या ट्रॅव्हल्सने निघाली, त्यामध्ये ती शेवटच्या प्रवासाला जात आहे, हे कुणाच्या गावीही नव्हते. आई-बाबा, मी लवकर परत येते, असे म्हणत तिने निरोप घेतला तो अखेरचाच ठरला.