पालिकेच्या कॉम्प्लेक्सपासून सुरुवात : व्यावसायिकांनीच काढले अतिक्रमणभंडारा : मागील अनेक वर्षांपासून शहरातील धनदांडग्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानातील जागेव्यतिरिक्त रस्ता गिळंकृत करुन अतिक्रमण केले होते. पालिकेने वारंवार नोटीस बजावूनही ते काढण्यात आले नाही. यामुळे शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. या मोहिमेत ८५ अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बुलडोजर चालविण्यात आला. या कारवाईचे नागरिकानी स्वागत केले. तर व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला.शहरातील गांधी चौकात पालिकेचे कार्यालय आहे. या मुख्य चौकात नगर पालिका प्रशासनाने स्वत:चे व्यापारी संकूल उभारले आहे. या संकूलातील गाळे व्यवसायीकांना उपलब्ध करुन दिले आहे.मात्र येथील व्यापाऱ्यानी पालिका प्रशासनाला न जुमानता रस्त्यावर अतिक्रमण केल्याने गांधी चौकातील सौंदर्यीकरणाला आळा बसला होता. यासोबतच शहरातील धनाड्य व्यापाऱ्यांनीही अतिक्रमण करुन व्यवसाय थाटला. यावर पालिका प्रशासन अनेकदा व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या. मात्र त्या न जुमानता व्यापाऱ्यांचे अतिक्रमण वाढत चालले होते. पालिकेने सदर अतिक्रमण हटविण्यासाठी या आठवड्यात सर्व व्यापाऱ्यांना नोटीस बजावून लाऊडस्पिकरद्वारे जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी १२ वाजेपासून पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण पडोळे, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी आनंद मिश्रा, कनिष्ठ अभियंता रविंद्र जामुणकर, संग्राम कटकवार, मुनेश मोगरे, अंकुश गजभिये, रविकांत भोवटे, पवण मोगरे आदींनी अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. (शहर प्रतिनिधी)
अतिक्रमणावर चालला ‘बुलडोजर’
By admin | Published: January 17, 2015 10:52 PM