अमरावती : एका विवाहितेच्या कपाटात काळ्या कपड्यामध्ये पुरचंडी बांधून त्यात हळदी- कुंकू, केसांचा पुंजका ठेवून तिला घाबरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सासरची मंडळी तेवढ्यावरच न थांबता त्यांनी त्या विवाहितेला घराबाहेर काढून टिनाच्या खोलीत कोंडले. तिचा मोबाइलदेखील हिसकावण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तिचा पती, सासरा व एका महिलेविरुद्ध ११ जुुलै रोजी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, महिलेचे ऑक्टोबर २०१८ मध्ये भुसावळलगतच्या वरणगाव येथील तरुणाशी लग्न झाले. त्या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगीदेखील आहे. लग्नानंतर पतीने तिला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला, तसेच तिच्या आई-वडिलांची शेती व त्यांचे घर आपल्या नावावर कर असेही त्याने तिला बजावले. लग्नामध्ये सोने कमी दिले. आई-वडिलांकडून सोने घेऊन ये, नाही तर घरात राहू नकोस, अशी तिची प्रतारणा करण्यात आली. सन २०२२ च्या जानेवारी महिन्यात संक्रांतीवेळी विवाहितेला तिच्या कपाटात एका काळ्या कपड्यामध्ये बांधलेली पुरचंडी दिसली. त्याबाबत पतीला विचारणा केली असता, त्याने तिला मारहाण करून बाजूच्या टिनाच्या खोलीत कोंडून ठेवले. मोबाइलही हिसकावून घेतला.
तर जिवाने मारेन!
दरम्यान, तिचे आई-वडील मुलीच्या सासरी आले असता, सासरने तुमच्या मुलीला घेऊन जा, असे बजावल्याने ती मे २०२२ मध्ये माहेरी अमरावतीला आली. त्यानंतर आठ दिवसांनंतर तिच्या पतीने तिला घटस्फोटाची नोटीस पाठविली. विचारणा केली असता, परत आमच्या घरी येऊ नकोस, आलीस तर तुला जिवाने मारून टाकू, अशी धमकी तिला देण्यात आली.
तारखी चुकविल्या
पतीने नोटीस पाठविल्याने तिने आयुक्तालयातील महिला सहायक कक्ष येथे तक्रार दिली. मात्र, तीनही आरोपी एकाही तारखेवर हजर राहिले नाहीत. उलटपक्षी मला तुला नांदवायचे नाही, मी दुसरे लग्न करीत आहे, तू परत येऊ नकोस, असे पुन्हा तिला बजावले. समेट घडून न आल्याने ते प्रकरण गुन्हा दाखल करण्यासाठी बडनेरा पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. तेथे गुन्हा दाखल करण्यात आला.