धारणी : येथून ४० किलोमीटर अंतरावरील फॉरेस्ट मालूर या गावातील गजानन खडके यांच्या घराला शुक्रवारी मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. या आगीत त्यांचे घर जळून खाक झाले.
आगीची सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना मिळाली असता, त्यांनी नगरपंचायतच्या प्रशासक तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना ती माहिती दिली. मिताली सेठी यांनी नगरपंचायतचे लिपिक अमिन शेख यांना अग्निशमन वाहन घेऊन तात्काळ फॉरेस्ट मालूर येथे पाठविले. रात्री १२ च्या सुमारास आग आटोक्यात आली. तोपर्यंत गजानन खडके यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले होते. नुकसानाचा अंदाज पन्नास हजारांच्या जवळपास असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही. फॉरेस्ट मालूर हे गाव वनविभागाच्या पुनर्वसनाच्या यादीत असून, त्याची प्रक्रिया सुरू आहे.