मोर्शी : लगतच्या उदखेड येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतात अचानक आग लागून दोन एकरांतील गहू जळून खाक झाला. यात जवळपास दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघड झाली.
उदखेड येथील शेतकरी बाळू पंजाबराव ठाकरे यांचे उदखेड शेतशिवारात अडीच एकर शेत असून, त्यांच्या शेतात महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत तारेचा खांब आहे. या खांबावरूनच समोर उच्चदाबाची वाहिनी गेली आहे. १ एप्रिल रोजी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे त्यांच्या शेतातील तारेच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्कीट होऊन त्यांनी पेरलेला दोन एकरांतील गहू पूर्णत: आगीत जळून भस्मसात झाला. तद्वतच शेतात टाकलेले स्प्रिंकलर पाईप तसेच बाशे व शेतातील काही संत्राझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ३ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे बाळू ठाकरे सकाळी शेतात गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लगेच गाव गाठून या प्रकाराची माहिती गावातील नागरिकांना दिली. अशोक ठाकरे यांनी ही माहिती दूरध्वनीवरून महावितरण, कृषी व महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिली. कार्यकारी अभियंता रहाटे व तलाठी आमझरे यांनी पंचनामा केला.
---------