नांदगाव पेठ येथील घटना : आरोपीस नागपूरहून अटक अमरावती / नांदगाव पेठ : मोलमजुरीकरिता आलेल्या मीत्रामध्ये घरगुती कामावरून वाद उफाळला आणि एकाने दुसऱ्याची हत्या करून मृतदेह जाळून टाकला. नरेश मोतीलाल पाटील (४८, रा.अजनी नागपूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना नांदगाव पेठ येथील औद्योगिक वसाहतीमधील एसएमएस कंपनीत शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी आशिष हरिभाऊ वाकोडीकर (२५, रा. सोनबानगर, नागपूर) याला मध्यरात्रीतून अटक केली. पोलीस सूत्रानुसार, नांदगाव पेठमधील एसएमएस कंपनी काम करण्यासाठी मृत नरेश पाटील, आशिष वाकोडीकर व अजय पटोते हे तिघे मित्र आले होते. तेथे रंगरंगोटीची कामे करून तेथेच एका झोपडीत तिघेही राहत होते. अन्य मजूरसुध्दा शेजारीच राहत होते. शुक्रवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास हे तिघेही घरीच असताना अन्य मजूर बाजाराकरिता बाहेर गेले होते. दरम्यान, घरगुती कारणावरून आळशीपणाचा आव आणून आरोपीने मृत व तक्रारकर्त्यासोबत वाद केला. वाद निवळल्यानंतर सर्वजण झोपायला गेले. मात्र, आरोपी आशिषच्या मनात राग खदखदत असल्यामुळे त्याने झोपेत असलेल्या नरेशवर रॅप्टरने हल्ला चढविला. नरेश याचा अति रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. नरेशचा मृत्यू झाल्याचे आरोपीला समजताच त्याने कंपनीच्या आवारात खड्डा खोदला. त्यानंतर नरेशचा ओढत नेत खड्यात टाकला व मृतदेहावर लाकडी रॅप्टर टाकून रॉकेलने जाळून टाकले. हे दृश्य पटोतेसह अन्य मजूर पाहत होते. मृतदेह जाळल्यानंतर आशिष तेथून पसार झाला. या घटनेची माहिती अजय पटोतेसह अन्य मजुरांनी नांदगाव पेठ पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अनिल किनगे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. मध्यरात्री उशिरा पोलिसांनी नातेवाईकांच्या माध्यमातून आरोपी आशिषला नागपूरहून अटक केली. (प्रतिनिधी)आरोपीने घरगुती कारणावरून ही हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. आरोपीला नागपूरवरून अटक करण्यात आली आहे. - रियाजुद्दीन देशमुख, सहायक पोलीस आयुक्त.
हत्या करून मित्रानेच जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2016 12:03 AM