दर्यापूर : स्थानिक आगारात कार्यरत वाहक रोशन वानखडे यांनी सोमवारी अमरावती-अंजनगाव फेरीवर एसटी बसमध्ये पडलेले पाकीट प्रवाशाला मिळवून दिले. यामध्ये ७५ हजारांचा धनादेश होता. याबद्दल वानखडे यांचा सत्कार करण्यात आला.
शोएब खान नामक इसम अंजनगाव आगारात उतरला. मागच्या खिशातून पैशाचे पाकीट खाली पडल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. या पाकिटात पंच्याहत्तर रुपयांचा धनादेश, तीन हजार रुपये रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन एटीएम होते. वानखडे यांनी पाकिटातील दवाखान्याच्या चिठ्ठीवरून नंबर डायल करून शोएब खान यांच्याशी संपर्क साधला व त्यांचा ऐवज परतविला. याबद्दल दर्यापूर आगारात पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दर्यापूर आगाराचे व्यवस्थापक जयकुमार इंगोले, अमोल ठाकरे, आनंद कट्यारमल, शेख नावेद हे उपस्थित होते.