लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील बस स्थानक ते तहसील कार्यालय मार्गावर रस्त्यालगत अतिक्रमण थाटणाऱ्यांना ते हटवण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामुळे दहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर का होईना, या मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढले जाणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.चांदूर बाजार ते वलगाव, अमरावती या मार्गावरील बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत लहान-मोठ्या अशा शेकडो दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले. या दुकानदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. अनेक दुकानदारांना महावितरणकडून वीज जोडणी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमित असलेला हा भाग चांदूर बाजार नगरपालिका व शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीत येत असून, आजवर अतिक्रमणधारकांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चारपदरी रस्त्याच्या निर्मितीला सदर अतिक्रमणधारक अडसर ठरत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावली.
ग्रामपंचायतकडूनही कारवाई नाहीमार्गात जागा मिळेल तिथे दुकान थाटून अनेक व्यावसायिकांनी लहान-मोठे व्यवसाय येथे उभारले आहे. रोजगाराचा प्रश्न समोर करून मुख्य रस्त्यावर आपले दुकान थाटून शेकडो व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करीत आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीची कोंडी या मार्गावर सतत होत असते. या मार्गाचा सर्वाधिक भाग शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीत येतो. ग्रामपंचायत प्रशासनाने यावर आजवर कोणतीच कारवाई केली नाही.
पादचारी, वाहनांची गर्दीविशेष म्हणजे, या मार्गावर बस स्थानक, पोलीस ठाणे, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक, तहसील कार्यालय, खरेदी-विक्री संघाचे कार्यालय, शिक्षक बँक, जिजाऊ बँकसह दोन शाळा, महाविद्यालय असल्याने नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर सर्वाधिक कार्यालये व बँका आहेत. त्यामुळे या मार्गावर पादचाऱ्यांची तसेच वाहनांची मोठी गर्दी असते. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही अधिक आहे.
रुग्णवाहिकांची मंदावते गतीचांदूर बाजार शहरातून रुग्णाला अमरावतीला रुग्णवाहिकेने नेताना या मार्गावर गतीवर नियंत्रण ठेवावे लागते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्ग चारपदरी करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.- अन्यथा कठोर कारवाईअतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण न हटविल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांनी दिली. ही कार्यवाही तहसीलदार अभिजित जगताप यांच्या मार्गदशनात आणि पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात केली जाणार आहे. यामध्ये नगरपालिका प्रशासनासह शिरजगाव बंड ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांचा सहभाग मिळविला जाणार आहे. शहरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही १० वर्षानंतर होत आहे, हे विशेष.