फोटो पी २० इतवारा बाजार
अमरावती : शहरातील मुख्य बाजार असलेल्या इतवारा बाजार परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी अमरावतीकरांसाठी नवी नाही. हा रस्ता पुढे वलगाव, परतवाडा, चांदूर बाजारकडे जात असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते.
चित्रा चौकापासून सुरू होणार्या या बाजारात रविवारी पाय ठेवायलाही जागा नसते. चित्रा चौक ते पुढे चांदणी चौकापर्यंत रूंद रस्ते असले, तरी या भागातील अतिक्रमणाचा पसारा पाहता पायी चालायचे कसे, असा प्रश्न पडतो. चित्रा चौक, इतवारा, टांगा पडाव ती पुढे थेट चांदणीचौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला व अन्य गाड्या लागत असल्याने निर्धोक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बॉक्स
रोज हजारो लोकांची येजा
इतवारा बाजारात रोज हजारो लोकांची येजा असते. येथे मुख्यत: भाजी मार्केट असल्याने मध्यमवर्गीयांसह सामान्यांचा येथे राबता असतो. या मार्गावर अलिकडे प्रभात चौक व चित्रा चौकात मोठे मार्केट आहेत. सोबतच भातकुली, अमरावती तालुका लागून असल्याने तेथून शहरात येणार्यांची मोठी लगबग इतवारा बाजार परिसरात असते.
बॉक्स
फुटपाथ कागदावरच
चित्रा चौक ते पुढे चांदणी चौकापर्यंत फुटपाथ बनविल्या गेले आहेत. मात्र, त्यावर फेरीवाले व हातगाड्यावाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या भागात प्रचंड अतिक्रमण झाले आहे. मात्र त्याला महापालिकेचा धरबंध नाही. येथील फुटपाथ कागदावरच आहेत.
बॉक्स
अतिक्रमण हटाव केवळ दाखवायलाच
या भागात महापालिकेद्वारे अनेकदा अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाते. त्याची प्रसिध्दीही देखील केली जाते. मात्र, दुसर्या दिवशी या भागातील अतिक्रमण पुन्हा जैसे थे होते. हा त्या भागातील नेहमीचा शिरस्ता आहे. त्यासाठी महापालिकेच्या सातत्यपुर्ण मोहिमेची गरज आहे.
बॉक्स
पायी चालावे कसे
दर रविवारी इतवारा भागात भाजी घ्यायला जाते. मात्र, वाहनांची संख्या पाहता पायदळ जाण्यास मन धजावत नाही. मात्र, वाहनांची गर्दी इतकी त्यात दुचाकीदेखील निट चालवता येत नाही. या मार्गाने जाताना अपघाताची भीती नेहमीच असते.
वेणू चौधरी, पादचारी
पायी चालायची भीती
टांगापडाव चौकातून वाहने अस्ताव्यस्तपणे दामटली जातात. कोण कुठे चाललाय, कोण कुठे वळतो, ते देखील लक्षात येत नाही. फळांची गाड्या अगदी रस्त्यावर लागत असल्याने पायी चालायचे कसे, हा प्रश्न उपिस्थत होतो. वाहतूक पोलिसांची गस्त हवी.
मनीष रेचे, पादचारी
अधिकारी म्हणतात
इतवारा बाजारासह शहरातील बहुतांश भागात नेहमीच अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली जाते. अतिक्रिमतांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. महापालिकेकडून होणारी कारवाई निरंतर सुरू आहे.
अजय बन्सेले, अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख