लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवसा ऑटो डीलचा व्यवसाय व रात्री त्याआड दुचाकी चोरीचा गोरखधंदा करणाऱ्या अट्टल चोराला फ्रेजरपुरा पोलिसांनी ३० मार्च रोजी अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच तो पटापटा बोलू लागला अन् पोलिसांच्या हाती चोरीच्या १८ दुचाकीचे घबाड लागले. ३१ मार्च रोजी त्याच्या ताब्यातून ७.५० लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना यश आले. अब्दुल वसीम अब्दुल वहीद (३०,रा. चपराशीपुरा), असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे.अ. वसीम ऊर्फ गोलू हा पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आला आहे. त्याच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. अब्दुल वसीमचा चपराशीपुरा परिसरात ऑटो डीलचा व्यवसाय आहे. तो मौजमजेसाठी ऑटो डील व्यवसायाआड दुचाकी चोरी करीत होता. बनावट चावीच्या साहाय्याने तो दुचाकी चोरून नातेवाईक, मित्रमंडळींना कमी किमतीत विकत होता. फायनान्सच्या दुचाकी आहेत, कागदपत्रे लवकरच आणून देऊ, असे सांगून तो दुचाकी विकत होता, असे ठाणेदार कुरळकर यांनी सांगितले.आरोपी अ. वसीम ऊर्फ गोलू हा एसआरपीएफ भागाकडून चोरीची दुचाकी घेऊन येत असल्याच्या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ३० मार्च रोजी वडाळी नाका येथे नाकाबंदी करण्यात आली. तो एमएच २७ ए ८९३९ क्रमांकाच्या दुचाकीसह मिळून आला. ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीच्या एकूण १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या. पीसीआरदरम्यान आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
येथून चोरल्या दुचाकीत्याने विश्रामगृह, कोर्ट परिसर, पीडीएमसी, भातकुली तहसील कार्यालय, शुक्रवार बाजार, महेंद्र कॉलनी अशा परिसरातून दुचाकी चोरल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या १५ दुचाकीपैकी सात दुचाकी फ्रेजरपुरा, सहा गाडगेनगर, एक बडनेरा आणि एक कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे तपासात समोर आले आहे. शुक्रवारी त्याच्याकडून आणखी तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यामुळे जप्त दुचाकीचा आकडा १८ वर पोहोचला आहे. तो मागील एक वर्षापासून दुचाकी चोरी करीत होता. मात्र, मागील तीन ते चार महिन्यांपासून त्याचे दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या नेतृत्वात अंमलदार योगेश श्रीवास, दिनेश मिश्रा, हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे, हरीश चौधरी, नीलेश जगताप, धनराज ठाकूर, अनूप झगडे, शिवराज पवार यांनी केली.