अमरावती : लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत असून बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक इत्यादी निविष्ठा बाजारात उपलब्ध होत आहे. येता खरीप हंगामात कापूस बियाण्याची खरेदी करीत असताना सतर्क व सावध रहावे. राऊंड अप बी टी/एच टीबीटी/ जी-3 तणावरची बी टी/ विडगार्ड प्रकारच्या कापूस बियाणेची खासगी व्यक्तीमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होऊ शकते. कृषी निविष्ठांची खरेदी डोळसपणे व अधिकृत मार्गानेच करण्याची दक्षता शेतकरी शेतकरी बंधू भगिनींनी घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले.
असे बियाणे अनधिकृत असून, त्या बियाण्यांच्या विक्रीला केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध घातलेला आहे. अशा अनिधिकृत, बोगस व बेकायदेशीर बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, मालाच्या गुणवत्तेचे विवरण, वाण याचा उल्लेख नसतो. हे बियाणे अवाजवी दराने विकून व कोणत्याही प्रकारची पावती किंवा बिल न दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा बियाण्यांची भौतिक व जनुकीय शुध्दता माहिती नसते. याच्या वापरामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे अशा बियाण्यांचा वापरामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होऊन आपल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
येथे करा तक्रार
आज बाजारात मोठ्या प्रमाणात सरकारमान्य बोलर्गाड व बोलर्गाड -२ तंत्रज्ञान युक्त बियाण्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बंधुंनी कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनानुसार शासनमान्य परवानाधारक विक्रेताकडूनच कापसाच्या अधिकृत बियाण्याची खरेदी करावी. जर एखादी व्यक्ती /कृषी सेवा केंद्रधारक बोगस व बेकादेशीर, शासन मान्यता नसलेल्या कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत नजीकच्या तालुका कृषी कार्यालयात, कृषी विभाग, जिल्हा परिषद किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर तक्रार करावी.
कोट
बियाणे खरेदी करतेवेळी पाकिटावर सरकारमान्य चिन्ह असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावर सरकारमान्य बोलगार्ड -२ चे चिन्ह सोबत दोन उभ्या रेषा तपासून घ्याव्यात. बियाणे पाकिटावर कापसाच्या वाणचे नाव, नंबर, बॅच नंबर व अंतिम मुदत तपासावी. बियाण्याचे पाकीट सीलबंद मोहरबंद असल्याची खात्री करूनच खरेदी करावे.
- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक