अमरावती : खरीप हंगाम सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यात कापूस पिकाची २ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. कापसाची उत्पादकता ४४१ किलोग्रॅम रुई प्रती हेक्टर इतकी आहे. कापूस पिकाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी बाबींवर भर देणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. बियाणे अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह खरेदी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
कापूस बियाण्याची खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बनावट तसेच भेसळयुक्त बियाण्यांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पावतीसह बियाणे खरेदी करावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सीलबंद किंवा मोहर लागल्याची खात्री करावी. याबाबत कृषी विभागाने व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. अधिकृत बीटी बियाण्यांची विक्री होईल व परराज्यातून अनधिकृत वाणाची विक्री होणार नाही याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. शेत जमिनीतील मातीच्या नमुन्याची तपासणी करून जमीन आरोग्यपत्रिका अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. शेतकऱ्यांनीसुध्दा अशा प्रशिक्षणाला उपस्थित राहून आवश्यक पिकांच्या नोंदी ठेवाव्यात. नत्राच्या स्थिरीकरणातून रासायनिक नत्र खताची बचत करण्यासाठी ॲझँटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीलम यासारख्या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. कापसात मूग व उडीद अशा आंतरपिकांचा समावेश करावा. फवारणीद्वारे मैग्नेशिअम सल्फेट, युरिया, डीएपी इ. खतांचा वापर केल्यास रासायनिक खताची बचत होऊन लाल्या विकृती व्यवस्थापनासाठी मदत होईल. रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी विद्राव्य खतांचा फर्टीगेशनद्वारे वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे वापर करण्याकरिता सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जैविक खतांचा एकात्मिकरीत्या अवलंब करावा.
गुलाबी बोंडअळी व बोंडसडीबाबतचे नियोजन
कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करून कापसाची पूर्वहंगामी (मे मधील) लागवड टाळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे गरजेचे आहे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मृद परीक्षण करून नत्र खताचा वापर करावा. जिल्ह्यातील जिनिंग मिल्स, कापूस एकीकरण केंद्र व गोदामात फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करावे. बोंडसडीच्या व्यवस्थापनासाठी जमिनीचा निचरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल यांनी केले.