अमरावती:
नांदगाव पेठ येथे कॅबचालकाचा गळा कापून त्याची हत्या करत पळालेल्या मुख्य मारेकऱ्याला अटक करण्यात गुन्हे शाखेचे पोलिसांना यश आले. तो मुख्य आरोपी असून, त्याने अन्य एका सहकाऱ्याच्या साथीने लुटीच्या उद्देशातून ती हत्या केली असावी, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शनिवारी दिली. सिध्देश्वर चव्हान (२६, रा. खलवे, पोस्ट: बोंडले, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अमरावतीत पोहोचले. आपल्या डोळ्यादेखत एका अनोळखी तरूणाची आपल्याच घराच्या पोर्चमध्ये चाकुने भोसकून हत्या करण्यात आल्याची तक्रार लक्ष्मण शिंगणजुडे यांनी नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली होती. २६ मार्च रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास भैय्या बचाव या आवाजाने शिंगणजुडे दाम्पत्याला जाग आली. त्यांनी खिडकीचे स्लायडिंग ग्लास सरकून पाहिले असता, त्यांना एकाची हत्या होत असल्याचे दिसले. दरम्यान, मृताचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मृताची ओळख अजीमखान खालिदखान (२७, नागपूर) अशी पटली. तो कॅबचालक असल्याचे स्पष्ट होताच, त्याचे चारचाकी वाहन रहाटगावनजिक अपघातग्रस्त स्थितीत आढळून आले. त्यामुळे अजीमखानची हत्या करून आरोपी मृताची कार घेऊन पळाल्याचे व तिला पुढे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. सकाळी ५.३० वाजतापर्यंतचे अमरावती शहरातील विविध ठिकाणच्या फुटेजमध्ये आरोपी दिसून आले. त्यातून तपासाची दिशा निश्चित झाली. आरोपी हे बडनेराहून कुठल्याशा वाहनाने बुलढाणा, चिखली, अहमदनगरमार्गे शिर्डीला पोहोचल्याची माहिती मिळताच आरोपीपैकी सिध्देश्वर चव्हान याला शुक्रवारी रात्री शिर्डीहून ताब्यात घेण्यात आले. दुसराही आरोपी माळशिरस तालुक्यातील असून, चव्हानविरूध्द इंदापूर ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सिध्देश्वर चव्हानला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.
या प्रकरणात आरोपींचा हेतू नेमका काय होता, ते पीसीआरदरम्यान स्पष्ट होईल. मात्र टॅक्सीचालकांना मारहाण करून त्यांना लुटायचे, हा आरोपींचा समावेश असलेल्या गॅंगची गुन्ह्याची रित आहे. दुसरा आरोपी देखील निष्पन्न झाला आहे.नवीनचंद्र रेड्डी,पोलीस आयुक्तकुकरी मिळाली, नागपूरच्या फुटेजने सोडविला गुंतागुन्ह्यात वापरलेली कुकरी पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधून जप्त केली. दोन्ही आरोपी हे नागपूरच्या बर्डी येथून अजीमखानच्या कारमध्ये बसले होते. ते तेथील सीसीटीव्हीत कैद झाले होते. याशिवाय ज्या ऑटोचालकाने आरोपींना अजीमखानच्या कारमध्ये बसविले होते, त्याच्या सांगण्यावरून नागपूरच्या एअरपोर्टसह तेथील रेल्वेस्टेशन व अमरावतीचे असे एकुण ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजने तपास सोपा केला. दोन्ही आरोपी बिहारमधील दरभंगा येथून जबलपूरला आले होते. त्यामुळे आरोपींनी दरभंगा येथून असे काही आणले होते, की त्यातून अजीमखान व आरोपींमध्ये वाद झाला, त्यादृष्टीने देखील तपास होत आहे.
यांनी केली कारवाईसीपी नवीनचंद्र रेड्डी, डीसीपी सागर पाटील व विक्रम साळी, एसीपी प्रशांत राजे व दत्ता ढोले यांच्या मार्गदर्शनात नांदगावचे ठाणेदार प्रवीण काळे, क्राईम पीआय अर्जुन ठोसरे, सायबर ठाणेदार सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात एपीआय रवींद्र सहारे, पंकजकुमार चक्रे, दत्ता देसाई, महेश इंगोले, उपनिरिक्षक नरेशकुमार मुंढे, राजकिरण येवले व महेंद्र इंगळे यांच्यासह सायबरचे अंमलदार संग्राम भोजने यांनी केली.