लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहशतवादी कारवाया, घातपाती हल्ले टाळण्यासाठी ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. मात्र, आजही बहुतांश ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर अद्यावत सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा यंत्रणेबाबत विलंब होत असल्याप्रकरणी ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही, हे विशेष.२६ नोव्हेंबर २००८ रोजी अजमल कसाब व इस्माईल खान या दोन अतिरेक्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकावर बेछूट गोळीबार करून ५२ निष्पापांचे मुडदे पाडले होते. या घटनेनंतर देशातील रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबाबत आॅडिट झाले. प्रामुख्याने ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय झाला. मात्र, सन २०११-२०१२ च्या अहवालातून रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा यंत्रणेच्या विलंबाविषयी ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम (आयएसआय) ही अद्ययावत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत मुंबई, पुणे, सोलापूर विभाग आघाडीवर आहेत. भुसावळ रेल्वे विभाग मात्र आयएसआय या सुरक्षा यंत्रणेविषयी फारच मागे असल्याची माहिती आहे. अद्यापही भुसावळ, अकोला, मनमाड, खंडवा, जळगाव, अमरावती व बडनेरा या ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकावर परिपूर्ण सुरक्षा यंत्रणा नाही. बडनेरा रेल्वे स्थानकावर लगेज स्कॅनर असले तरी ते शोभेची वास्तू ठरत आहे. अमरावती व बडनेरा या दोन्ही रेल्वे स्थानकावर कसेही, कोठूनही प्रवेश करता येतो, हे वास्तव आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेबाबत मोहीम सुरू केली, तीच मोहीम सुरक्षेविषयी राबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.‘आयएसआय’ सुरक्षा यंत्रणा म्हणजे काय?रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आयएसआय’ सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वाहनांची खालच्या भागात तपासणीसाठी डिव्हाईस प्रणाली, सर्व्हेलन्स कॅमेरे, प्रवाशांची बॅग, सामानांसह स्क्रिनिंग प्रणाली, अॅक्सेस कंट्रोल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, डोअरप्रूफ मेटल डिटेक्टर, हॅन्डमेड मेटेल डिक्टेटर, सीसीटीव्ही, एक्सरे कॅमेरे आणि अंडर व्हिकल स्नॅकरचा समावेश असणार आहे.रेल्वे स्थानकांच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत अमरावती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. मुख्य प्रवेशद्वारावर लगेज स्कॅनर लावण्याचे प्रस्तावित आहे.- आर.टी. कोटांगळेप्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक.
रेल्वे स्थानकावर सुरक्षा विलंबप्रकरणी ‘कॅग’चे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:35 PM
दहशतवादी कारवाया, घातपाती हल्ले टाळण्यासाठी ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर अद्ययावत सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला होता. मात्र, आजही बहुतांश ‘अ’ दर्जाच्या रेल्वे स्थानकांवर अद्यावत सुरक्षा यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.
ठळक मुद्देसीसीटीव्ही नाही : अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा बोजवारा