हेच का अच्छे दिन ? : यार्डातील तूर खरेदीच्या शासनादेशात जाचक अटीअमरावती : अडीच लाख क्विंटल तूर केंद्रावर व त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या घरी पडून असताना केंद्र बंद करण्यात आलीत. यार्डात पडून असलेली तूर खरेदी करण्याच्या आदेशाला पाच दिवस लागलेत. या आदेशातही अनेक जाचक अटी आहेत, तूर उत्पादकाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याने हेच का ‘अच्छे दिन’, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांचा आहे.जिल्ह्यातील दहा तूर खरेदी केंद्र २२ एप्रिल रोजी बंद केलेत. येथे अडीच लाख क्विंटल तूर पडून आहे. ही तूर खरेदी करण्याचे आदेश सरकारने २७ एप्रिल रोजी सायंकाळी दिलेत या आदेशातही जाचक अटी असल्याने तुरीचे बंपर उत्पादन शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. मुळात नाफेडची केंद्र अर्धेअधिक दिवस बारदाना नाही, गोदाम नाही आदी क्षुल्लक कारणामुळे बंद राहिली आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच झुकते माप दिल्या गेल्याचा आरोप आहे. चाळण्या कमी, मोजणीचा वेग मंद यामुळे शेतकऱ्यांना दोन-दोन आठवडे तूर मोजणीसाठी तिष्ठत राहावे लागते व चुकाऱ्यांना महिन्याचा अवधी लागत आहे. आता यार्डात शिल्लक असलेली तुरीची खरेदी करण्यासाठी राज्य सहकारी पणन महासंघ व विदर्भ सहकारी पणन महासंघ या संस्थांना नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र जोवर समितीमार्फत शेतमालाची पडताळणी होत नाही व शेतकरी स्वत:चा माल असल्याचे व आजवर कोठे व किती शेतमाल विकल्याचे ‘सेल्फ डिक्लेरेशन’ देत नाही तोवर या यंत्रणांना देखील तूर खरेदी करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे या जाचक अटीत तूर खरेदी अटकली आहे. (प्रतिनिधी)-हा तर शेतकऱ्यांवर अविश्वास !यार्डावरील तूर मोजणीच्या पूर्व शेतकऱ्यांना सात-बारा, उतारा द्यावा लागणार आहे. यंत्रणा पीक पेऱ्याप्रमाणे नोंद आहे काय याची खात्री करून कृषी विभागाने निश्चित केलेल्या हेक्टरी उत्पादनानुसार शेतकऱ्याजवळून तूर खरेदी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांकडून यापूर्वी शासनास कुठे-कुठे आणि किती क्विंटल तुरीची विक्री केली याबाबतचे सेल्फ डिक्लेरेशन घेण्यात येणार आहे व शेतकऱ्याच्या शेतातीलच उत्पादन याची खात्री झाल्यानंतरच तूर खरेदी करण्यात येणार असल्याने, हा तर शेतकऱ्यावरच अविश्वास असल्याचा आरोप होत आहे. ंजिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच तुरीची खरेदीयार्डावरील तुरीचा पंचनामा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील सहायक निबंधक, सहकारी संस्था, बाजार समितीचे सचिव, व्यवस्थापक, सबएजंट व खरेदीदार यंत्रणांचे प्रतिनिधी असणारी समिती करणार व २२ एप्रिलला आलेल्या तुरीची नोंदवही पडताळणीनंतर अंतिम करून जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द होणार आहे व त्यांनी मान्यता दिल्यानंतरच तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया क्लिस्ट असल्याने तूर मोजणीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे अनेक दिवस जाणार आहे. शेतकऱ्यांचा माल उघड्यावर, व्यापाऱ्यांचा शेडमध्येबाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये हजारो शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडला आहे. त्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांना कमी तर व्यापाऱ्यांना अधिक चाळण्या दिल्या जातात. शेतकऱ्यांसाठी बारदाना नाही. मात्र व्यापाऱ्यांना त्वरीत उपलब्ध होतो. यासह अनेक आरोप या केंद्रांवर होत आहेत.
तूर उत्पादकच आरोपीच्या पिंजऱ्यात
By admin | Published: April 30, 2017 12:01 AM