नांदगाव खंडेश्वर : बरेच वर्षांपासून शासकीय जागेवर राहणाऱ्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी त्या जागेची मोजणी करून सीमा निश्चित करा, अशी मागणी भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली.
नांदगावात बऱ्याच नागरिकांनी घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी नगरपंचायतीमध्ये प्रकरणे दाखल केली. बरेच नागरिक कित्येक वर्षांपासून शासकीय जागांवर अतिक्रमण करून राहत असल्याने शासकीय नियमाप्रमाणे ते अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी त्या जागेची मोजणी करण्यात यावी, या मुद्द्यावर नगरपंचायत कार्यालयामार्फत दोन वर्षांपासून भूमिअभिलेख कार्यालयाकडे पत्रव्यवहार होत आहे. पण, भूमिअभिलेख कार्यालयाने अद्यापही दखल घेतली नाही. परिणामी शेकडो कुटुंबे घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत.
सर्वांसाठी घरे-२०२२ या धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी या कुटुंबाच्या जागेची मोजणी करून रस्ते व सीमा निश्चित करून त्याचे नकाशे तयार करा, या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यासाठी कार्यकर्ते या कार्यालयात गेले होते. भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात हजर नसल्याने ते निवेदन त्यांच्या खुर्चीला चिकटविण्यात आले. यावेळी प्रहारचे कैलास चांदणे, दिनेश शेळके, आशिष खंडार, गजानन वर्धेकर, बाळू देशमुख, रूपेश भोयर व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होती.