अमरावती : आपला मुलगा रोजच शिविगाळ करतो, नेहमीप्रमाणे आजदेखील त्याने शिविगाळ केली. धक्काबुक्कीही केली, असा एक कॉल डायल ११२ वर आला. कॉलरकडून खात्री केल्यानंतर ती माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी धामधूम करणाऱ्या त्या मुलाकडून चक्क एक पिस्टल व खाली मॅगझिन जप्त करण्यात आली. २१ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास राजापेठ भागातील गोविंदनगर येथे ही कारवाई करण्यात आली. मुरली अंशीराम नानवानी (२१, रा. गोविदं नगर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
अंशीराम नानवाणी यांनी पहाटे दोनच्या सुमारास ती माहिती डायल ११२ ला दिली होती. एक मुलगा त्याच्या वडिलांना त्रास देत असल्याच्या माहितीवरून राजापेठचे बिटमार्शल गोविंदनगरात पोहोचले. त्यावेळी मुरली हा तेथे दिसून आला. त्याचवेळी तो स्वत:जवळ गावठी बनावटीचा देशी कट्टा सोबत बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे बिट मार्शल यांनी राजापेठच्या रात्रकालीन डयुटी ऑफिसर, तथा डीबी पथकाला पाचारण केले. तथा मुरली नानवाणी याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याजवळ २५ हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा देशी कट्टा आढळून आला.
सतर्कतेमुळे मिळाला आरोपी
आरोपीविरूद्ध राजापेठ पोलिसांत शस्त्र अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रात्र गस्तीवर असलेले नाईट डिओ, डीबी पथक, बिट मार्शल यांच्या सतर्कतेमुळे आरोपी मुरली नानवानीला पिस्टलसह ताब्यात घेण्यात आले. ही कार्यवाही पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, एसीपी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक पुणित कुलट, उपनिरिक्षक गजानन काठेवाडे व सागर ठाकरे, अंमलदार सागर सरदार, छोटेलाल यादव, दिनेश भिसे, सचिन पवार, नरेश मोहरील, प्रमोद सायरे, शेख वकील, दिपक काळे यांनी केली.