लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षी एका अमरावतीकराने ई-कॉमर्स वेबसाइटवरून दिवाळीच्या काळात एक महागडा मोबाइल मागवला. अधिक सूट मिळत असल्याने त्याने मोबाइलची संपूर्ण रक्कमदेखील आगाऊ भरली. दहा दिवसांनी डिलिव्हरी बॉय आला. तो पार्सल देऊन गेला. त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता, मोबाइलच्या डब्यात मोबाइल नव्हे, तर साबणाची वडी आढळली. डिलिव्हरी घेतेवेळी व्हिडीओ न काढल्याने कंपनीने हात वर केले अन् त्या बापुड्याचे लाखभर रुपये बुडाले. यंदा देखील दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे ऑनलाइनखरेदी करताना ती थोडी जपूनच करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिवाळी जवळ येत आहे आणि या आनंदाच्या सणाच्या काळात अनेकजण त्यांच्या कुटुंबासोबत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या उत्साही वातावरणात घोटाळेबाजही सक्रिय होत असतात. किंबहुना झाले आहेत. सणासुदीच्या काळात ऑनलाइनखरेदीमध्ये झालेली वाढ ही घोटाळेबाजांसाठी सुवर्णसंधी ठरते. अनेक फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स, अविश्वसनीय ऑफर आणि अनपेक्षित ई-मेलच्या माध्यमातून ग्राहकांना फसवण्याचे काम हे स्कॅमर्स करतात. अशा परिस्थितीत, आपली आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
काही फसव्या ऑफर्सी दिवाळीच्या काळात स्कॅमर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अविश्वसनीय सवलती देतात. ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त सूट असलेल्या ऑफर्स पाहून ग्राहक आकर्षित होतात. अनेकदा, हे घोटाळे फसव्या वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे होतात. अशा घोटाळ्यांमध्ये ग्राहक उत्पादनांसाठी ऑर्डर देतात; परंतु उत्पादन कधीही त्यांच्या हातात पोहोचत नाही. दिवाळीच्या काळात ऑनलाइन खरेदीवर अधिक भर दिला जात आहे. दिवाळी कॅश करण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या. ऑनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगा, नाही तर ऐन दिवाळीतच आपले दिवाळे निघू शकते.
कस्टमर केअर नंबर शोधताना घ्या काळजी कुठल्याही कंपनीची कुठलीही सेवा हवी असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिथे जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावर नेहमी कॉल करावा. गुगल सर्चमध्ये येणारे नंबर फेक असू शकतात हे ध्यानात ठेवले पाहिजे. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 'पिन देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
काय काळजी घ्याल?
- सुरक्षित वेबसाइट : ऑनलाइन खरेदी ही सुरक्षित अशा वेबसाइटवरूनच करा. ज्या ई-कॉमर्स कंपन्यांची वेबसाइट अधिकृत आहेत, त्यालाच प्राधान्य द्या.
- अनोळखी लिंक टाळा: खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असेल तरच त्याचे तपशील भरावेत.
- बँक खाते, कार्डचा तपशील सांभाळा : कोणत्याही वेबसाइटवर तुमचा 'आधार क्रमांक' किंवा 'बँक खाते क्रमांक किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित गुप्त क्रमांक नोंदवू नका.
- अनोळखी अॅप टाळा : कंपनीची किवा वेबसाइटची सत्यता तपासून पाहावी. संबंधित वेबसाइटवर त्याबाबतची काय माहिती देण्यात आलेली आहे, हे आपण पाहू शकतो.
तर तीन तासांत करा सायबरकडे तक्रारसायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच सायबर पोलिस ठाण्यात कॉल करावा. त्यानंतर सायबर यंत्रणा लगेचच कामाला लागते आणि अवघ्या ७ ते ८ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते.
अशी टाळा फसवणूक "मागविण्यात आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ करा. पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज असतील, तर ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होईल. कॅश ऑन डिलिव्हरीच उत्तम."- नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त