अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातून दहा महिन्यांपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेल्या चार वर्षीय वाघिणीच्या गळ्यातील पट्टारूपी बंद कॉलर आयडीने फास आवळायला सुरुवात केली आहे. कॉलर आयडी तिच्या गळ्यात दाटल्याने तिच्याकरिता तो धोकादायक झाला आहे.
मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातून ४५ दिवसांमध्ये २५० किलोमीटरचे अंतर पार करीत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात सर्वप्रथम ही वाघीण पोहोचली. ३१ जानेवारी २०२२ला ती सोनाळा वनपरिक्षेत्रातील अन्यार बीटमधील कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आली. तेव्हाच तिच्या गळ्यातील कॉलर आयडीचा सॅटेलाईटशी संपर्क तुटला होता. कॉलर आयडीची बॅटरी निकामी झाली होती.
व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रिसिव्हर अँटीनाच्या मदतीने तेव्हा तिचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. आकोट वन्यजीव विभागातील ६०० कॅमेरा ट्रॅपसह १२ स्वतंत्र कॅमेऱ्यांचा ट्रॅप केला गेला. देहरादून स्थित वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या चमूनेही तिचा शोध घेतला. पण, ती त्यादरम्यान आढळून आली नाही.
मेळघाटातच २६ दिवसांमध्ये १५० किलोमीटर भ्रमंती करीत ती सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोह पर्यटनक्षेत्रात २६ फेब्रुवारी २०२२ ला आढळून आली. सेमाडोहमध्येही तिचा पुढे शोध घेतला गेला. यादरम्यान तिने सेमाडोह, हरिसाल, चौराकुंड, रायपूर क्षेत्रात फेरफटका मारला आणि अलीकडे ती सेमाडोह पर्यटनक्षेत्रात स्थिरावली. मागील १५ ते २० दिवसांपासून ती पीपलपडाव ते टी-पॉइंट दरम्यान पर्यटकांना दिसते आहे.
जोडीदार मिळाला
भ्रमंती दरम्यान वाघिणीला जोडीदार मिळाला आहे. यामुळे गोड आनंददायक बातमीच्या प्रतीक्षेत सर्वच आहेत. पण, त्याआधी तिच्या गळ्यात दाटलेला पट्टारूपी कॉलर आयडी काढणे गरजेचे झाले आहे, अन्यथा ताडोबा, टिपेश्वरमधील घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.
हवाई अंतर ९० किलोमीटर
अंबाबरवा ते सेमाडोहपर्यंतचे एरियल (हवाई) अंतर ९० किलोमीटर आहे. बोरी, धुळघाट, वान, गोलाई, कोहा, कुंड, ढाकणा, तारूबांदामार्गे जंगल क्षेत्रातून भ्रमंती करीत ती २६ फेब्रुवारीला सेमाडोहमध्ये पोहोचली आणि स्थिरावली.
वाघिणीच्या गळ्यातील कॉलर आयडीबाबत सातपुडा व्याघ्र अभयारण्य प्रशासनासमवेत समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
- दिव्य भारती, उपवनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा.