अतिरिक्त बांधकाम पाडण्यासाठी नोटीस : बिल्डर्स लॉबी पदाधिकाऱ्यांच्या आश्रयालाअमरावती : शहरात विनापरवानगी अथवा परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करुन सदनिका उभारणाऱ्या मोठ्या इमारती महापालिकेने 'लक्ष्य' केले आहे. यापैकी काही बिल्डर्संना बांधकाम पाडण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या असून त्या पाडू नये, यासाठी बिल्डर्स पदाधिकाऱ्यांच्या आश्रयाला गेले आहेत. परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करून मुंबईच्या धर्तीवर 'कॅम्पाकोला' उभारण्याची शक्कल बिल्डर्सनी लढविली आहे.आयुक्त अरुण डोंगरे यांच्या आदेशानुसार झोन क्र. १ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सदनिका बांधकाम तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई येथे काही महिन्यांपूर्वी कॅम्पाकोला वसाहतीत झालेल्या नियमबाह्य बांधकामाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतसुद्धा सदनिकांच्या उभारणीबाबतची सत्यता तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार झोन क्र. १ अंतर्गत येणाऱ्या नवीन कॉलनी परिसरात निर्माणाधीन सदनिकांचे मंजूर नकाशानुसार बांधकाम आहे किंवा नाही हे तपासले जात आहे. महापालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेताच बिल्डर्स लॉबीचे धाबे दणाणले आहेत. बहतांश बिल्डर्संनी अतिरिक्त बांधकाम करुन त्या सदनिका विकण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. मात्र नियमबाह्य सदनिका उभारुन विकली जात असतील तर यात ग्राहकांची चक्क फसवणूक होत आहे. यापूर्वी राणा लॅन्डमार्कने ग्राहकांची फसवणूक केल्याचे प्रकरण गाजत असून सदनिका उभारणीत अनियमितता असेल तर याला कोण जबाबदार राहील, असा सवाल उपस्थित होत आहे. सदनिका उभारताना महापालिकेतून कमी बांधकाम मंजूर करुन घ्यायचे मात्र हे बांधकाम सुरु असताना अतिरिक्त बांधकाम करुन ते ग्राहकांना विकायचे हा नवा फंडा बिल्डर्स लॉबीने सुरु केला आहे. या अफलातून प्रकाराने महापालिकेचे बांधकाम मंजुरीचे शुल्क बुडविण्याचा प्रकार सुरु आहे.
अमरावतीतही ‘कॅम्पाकोला’
By admin | Published: February 05, 2015 10:59 PM