पोलिसांचे अपयश : गुन्हे शाखेसाठी आव्हानलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुख्यात बुकी संजय उदापूरकरला पकडण्यात अंजनगाव पोलिसांना अपयश आल्यानंतर प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेने पेलले आहे. संजय उदापूरकला राजकीय आश्रय मिळत असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याची माहिती मिळत होती. १२ मे रोजी अजंनगाव येथे उच्चभ्रू वस्तीमध्ये चालणाऱ्या आयपीएल क्रि केट सट्ट्यावर धाड घालून तीन आरोपींना अटक केली होती. क्रिकेटवरील सट्टा प्रकरणात आरोपींनी परतवाडा येथील बुकी संजय उदापूरकरचे नाव सांगितले होते. मात्र, त्याचा फोटो नसल्याने व त्याला कुणीच ओळखत नसल्याचे सांगून त्याला अटक करण्यात दिरंगाई केली जात होती. अखेर ‘लोकमत’ने संजय उदापुरकरचा फोटो प्रसिद्ध केला. मात्र, यानंतरही त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले नाही. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिंनाश कुमार यांनी अंजनगाव पोलिसांना ‘टाईम बॉण्ड’ दिला आहे, हे विशेष. आता स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या पद्धतीने संजय उदापूरकरला पकडण्याची स्वत:हून शोधमोहीम हाती घेतल्याने लवकर हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली. विशेष म्हणजे हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग न झाल्यामुळे अनेक चर्चाना उधान आले आहे. दरम्यान संजय उदापूरकरवर लावण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र आहेत. यामुळे तो जामीन मिळवू शकतो, असे वाटत असल्याने या प्रकरणात पोलिसांनी विशेष वकिलांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान संजय उदापूरकरदेखील जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हेशाखेवर दबाव संजय उदापूरकरला अटक करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे आली आहे. यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. १५ दिवसांपासून पसार असलेल्या उदापूरकरचा शोध स्थानिक गुन्हे शाखा घेणार का? याकडे लक्ष लागले आहे. मात्र याबाबत गोपनीयता राखली जात आहे.
संजय उदापूरकरला शोधण्यासाठी मोहीम
By admin | Published: May 30, 2017 12:13 AM