अमरावती : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मास्क वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले.
आरोग्य यंत्रणा, महापालिका व चाचणी प्रयोगशाळा आदींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेबाबत जनजागृती करताना दंडात्मक कारवाईही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परिस्थिती तपासूनच निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. कोविड चाचणी करणाऱ्या लॅबकडून, खासगी लॅबकडूनही त्यांनी आढावा घेतला व आयसीएमआर पोर्टलवर अचूक नोंदी करण्याचे निर्देश दिले. संशयित व्यक्तींची तपासणी करताना आरटीपीसीआर चाचणी करावी. आरोग्य यंत्रणेनेही उपचार सुविधांची तजवीज ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.