कॅप्शन - पत्रपरिषदेला उपस्थित (डावीकडून) जयसिंहराव देशमुख, अरुण मानकर, बबन नाखले, चंद्रकांत वानखडे, कुमार बोबडे
अमरावतीत पत्रपरिषद, जनआंदोलन छेडण्याची भूमिका
अमरावती : महात्मा गांधींना ‘फादर ऑफ पाकिस्तान’ संबोधणारे अनिल कुमार सौमित्र यांची अमरावतीच्या आयआयएमसी (भारतीय जनसंचार संस्था) येथे करण्यात आलेली नियुक्ती रद्द करावी. त्यांच्या रूपातील अविचारीपणा आम्हाला येथे नको, अशी भूमिका गांधीवादी विचारवंत व शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे यांनी मांडली. अमरावती येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मध्य प्रदेश भाजपच्या मीडिया सेलचे निलंबित प्रमुख अनिल कुमार सौमित्र यांची आयआयएमसीतील प्राध्यापकपदी नियुक्ती झाल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने ३१ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ज्यांचे नाव आहे, त्या गाडगेबाबांनी विचारांची घाण साफ करण्यासाठी आयुष्य वाहिले. त्याच विद्यापीठाच्या आवारातील संस्थेत महात्मा गांधींना ‘फादर ऑफ पाकिस्तान’ म्हणणारी व्यक्ती नियुक्त होते. अशाप्रकारे विद्यापीठाला डम्पिंग यार्ड बनवू नका. पंतप्रधान विदेशात महात्मा गांधींचे गोडवे गातात. आरएसएसनेही महात्मा गांधींना प्रात:स्मरणीय ठरवावे आणि बाहेर विखारी प्रचार करावा, हे अक्षम्य आणि अस्वीकारार्ह आहे. गांधी नाहीत, तर ‘फादर ऑफ इंडिया’ जिना आहेत काय? ‘सौमित्र प्रवृत्ती’ नवे नीतिमूल्य रुजवणार काय? त्यांना नथुराम गोडसेला ‘फादर ऑफ नेशन’ करायचे असेल, तर त्यांनी उघडपणे करावे. या प्रवृत्तीविरुद्ध आमचा लढा आहे. लोकही त्यात सहभागी होतील. पालकमंत्री, कुलगुरूंनी लक्ष घालून सौमित्र यांना दिल्लीला परत पाठवावे, अशी मागणी चंद्रकांत वानखडे यांनी केली.
माध्यमांची अनेक प्रकारे गळचेपी होत आहे. माध्यम संस्थांमध्ये विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्ती पाठवून गिनिपीग तयार केले जात आहेत. शिक्षणक्षेत्रात असे धोकादायक नियोजन केले जात आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत २०१४ सालीच स्वातंत्र्य मिळाले की काय, हे लोकांमध्ये ठसेल, अशी चिंता श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे जनसंवाद विभागाचे प्रमुख कुमार बोबडे यांनी व्यक्त केली.
अनिल कुमार सौमित्र ही एक प्रवृत्ती आहे. ती आयआयएमसी, अमरावतीत प्रवेश घेतलेल्या भावी पत्रकारांचे ब्रेन वॉश करून जाईल. त्यामुळे सौमित्र यांना विद्यापीठात पाय ठेवू देऊ नका, या मागणीचे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना देणार असल्याचे माध्यम संवाद तज्ज्ञ आनंद मांजरखेडे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आग्रहाखातर नागपूरऐवजी अमरावतीला मिळालेली आयआयएमसी ही संस्था अद्याप विद्यापीठाच्या आवारातच आहे. विद्यापीठात कुणीही येईल आणि ते सहन केले जाईल, असे समजू नये. सौमित्र यांची अमरावतीत नियुक्ती झाल्याने पत्रकार परिषद येथे घेतली, असा इशारा मूळचे नागपूरचे आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष बबन नाखले यांनी दिला.
विद्यापीठाच्या कॅम्पसचे कुलगुरू हे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना पत्र देऊ. या विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व मनुष्यबळ विकास मंत्री यांनाही अनिल कुमार सौमित्रच्या विषयात अवगत केले जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी व्यवस्थापन सल्लागार अरुण मानकर व सामाजिक कार्यकर्ते जयसिंगराव देशमुख यांचीही उपस्थिती होती.