जिल्हा परिषद पदभरती घोटाळा : अनेक पात्र उमेदवारांवर अन्यायअमरावती : यवतमाळ जिल्हा परिषदे प्रमाणेच अमरावती जिल्हा परिषदेत झालेल्या कर्मचारी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची नोकर भरती तातडीने रद्द करावी, यासाठी युवासेना, शिवसेना, एनएसयूआय, युवक काँग्रेस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीही या संघटनांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीचे पेपर फुटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेने तेथील टोळीला जेरबंद केले आहे. अमरावती जि.प.मध्ये ६ ते २६ आॅक्टोबर २०१३ मध्ये पदभरती दरम्यान सध्याचे यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुुल रंजन महिवाल हेच अमरावतीचे जिल्हाधिकारी व निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जि.प.मध्ये कनिष्ठ अभियंता, (१४) विस्तार अधिकारी(६), औषध निर्माण अधिकारी (१), आरोग्य सेवक महिला (२१), आरेखक (१), वरिष्ठ सहायक लिपीक(३),कनिष्ठ सहायक लिपिक(१०) कनिष्ठ सहायक लेखा(२), विस्तार अधिकारी सांख्यिकी(२), लघुलेखक निम्नश्रेणी (२), कनिष्ठ लेखाधिकारी(२), आणि परिचर (६७) अशा १३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी लेखी ते तपासणी, मुलाखती, निवड प्रक्रिया महिवाल यांनीच पार पाडली होती. त्यानंतर यवतमाळ जिल्हा परिषदेत २ ते २२ नोव्हेंबर दरम्यान सुमारे १०० विविध पदांच्या लेखी परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने उत्तरपत्रिका विकणाऱ्या टोळीतील मकरंद खामणकर, दादासाहेब वाडेकर, भागीनाथ गायके, विनोद वरकड, पोपट कऱ्हाळे या पाच आरोपीना औरंगाबाद येथे अटक केली आहे .
नोकरभरती रद्द करा - संघटनांची मागणी
By admin | Published: November 19, 2014 10:30 PM