अमरावती : कोविडने नवे रूप धारण केले आहे. उन्हाळी २०२० या अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकालाचा घोळ अजुनही संपला नाही. अशातच हिवाळी २०२० परीक्षा घेणे हे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांबाबत सकारात्मक विचार करून हिवाळी २०२० ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्या परिषदेचे सदस्य प्राचार्य आर.डी. सिकची यांनी केली आहे.
कुलगुरू मुरलीधर चांंदेकर यांना २२ डिसेंबर रोजी दिलेल्या पत्रानुसार, प्राचार्य सिकची यांनी उन्हाळी २०२० परीक्षेत उडालेला गोंधळ आणि विद्यार्थांची मानसिकता विशद केली आहे. यंदा एकूण सहा परीक्षांचे नियोजन परीक्षा विभागाने केले आहे. त्यामुळे आताच हिवाळी परीक्षांचे नियाेजन केल्यास अधिकारी, कर्मचारी वैतागून जातील, असे सिकची यांचे म्हणने आहे. हिवाळी २०२० मध्ये होऊ घातलेल्या पदवी परीक्षांच्या सत्र १, सत्र ३ व सत्र ५ आणि पदव्यु्तर पदवी परीक्षेच्या सत्र १ व सत्र ३ आदी (नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या) परीक्षा फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू होऊ शकणार नाही, असे चित्र आहे. दरम्यान महाविद्यालयीन शिक्षण अद्यापही सुरू झाले नाही. शैक्षणिक सत्र सुरू होणे आणि प्रत्यक्षात शिक्षण सुरू होणे यात मोठा फरक आहे. कोरोना पूर्णत: गेलेला नाही. संकट कायम आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षा घेऊ नये, असे प्राचार्य सिकची यांची मागणी आहे.
---------------------
बॉक्स
असे करावे परीक्षेचे नियोजन
शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ हे नियमित सुरू व्हावे, यासाठी हिवाळी २०२० परीक्षेतील पदवी परीक्षेचे सत्र १ व सत्र ३, सत्र ५ आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेचे सत्र १ व सत्र ३ या परीक्षा पूर्णत: रद्द कराव्यात. त्याऐवजी उन्हाळी २०२१ मध्ये सरळ पदवी परीक्षेचे सत्र २ व सत्र ४, सत्र ६ आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या सत्र २ व सत्र ४ च्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात वाजवी कपात करुन परीक्षांचे नियोजन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सिकची यांची आहे.