अमरावती, दि. 15 - राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावतीत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय वनपरिषदेला शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी येणार होते. मात्र, अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने वनपरिषदेचा जणू आत्माच हरविल्याचे चित्र दिसून आले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख विकास प्रबोधिनीत १५ व १६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वनपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला राज्यभरातून शेकडो वरिष्ठ वनाधिका-यांनी आवर्जुन हजेरी लावली आहे. परिषदेला वनमंत्री येणार असल्याने वरिष्ठ वनाधिका-यांनी अजेंड्यानुसार आवश्यक ती माहिती देखील सोबत आणली. मात्र ना. सुधीर मुनगंटीवार, ना. राजे अंबरीशराव यावनखात्याशी संबंधित दोन्ही मंत्र्यांचे दौरे रद्द झाले आहेत. त्यामुळे या वनपरिषदेची धुरा प्रधान मुख्य वनसंक्षरक भगवान, प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांनी सांभाळली आहे.ही दोन दिवसीय परिषद यशस्वी व्हावी, कोणतीही उणिव राहू नये, यासाठी अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शेकडो वनाधिकारी, कर्मचाºयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु वनमंत्री मुनगंटीवार उपस्थित न राहिल्याने ही परिषद वरिष्ठ वनाधिकाºयांसाठी केवळ औपचारिक ठरली. यापरिषदेला चांदाते बांद्यापर्यंतचे सर्व वरिष्ठ वनाधिकारी उपस्थित झालेत. काही वरिष्ठ वनाधिकाºयांनी वनविकासाबाबतचा नवा आराखडा देखील सोबत आणला. मात्र, वनमंत्र्यांची अनुपस्थिती अनेक बड्या अधिकाºयांचा हिरमोड करणारी ठरली.वनसचिव विकास खारगे यांनी वनपरिषदेची धुरा हाती घेऊन भविष्यातील वनविकासाचे ‘ब्लू प्रिन्ट’ त्यांनी वरिष्ठ वनाधिकाºयांना दिले. या दोन दिवसीय परिषदेत वृक्षारोपण, वनविकास महामंडळांच्या योजनांचा आढावा, १ ते ७ जुलै दरम्यान पावसाळ्यातील वृक्षारोपणाचा अहवाल, येत्या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचे जिल्हानिहाय टार्गेट, जमिनींचा अहवाल, १ आॅक्टोबर २०१७ पासून दोन वर्षांत ४६ कोटी वृक्षलागवडीवर मंथन, वृक्षांसाठी ट्री-गार्ड, जनवानिकी विकास योजना, वनविकास आराखडा, बांबूविकास, रस्ता दुर्तफा वृक्षलागवड, ईको टुरिझम यांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीविषयी यावेळी मंथन करण्यात आले.वनपरिषदेचा आज समारोप...राज्यस्तरीय वनपरिषदेचा समारोप शनिवार १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. राज्याचे प्रधान मुख्यवनसंरक्षक भगवान, प्रधान मुख्य वनसचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाने या परिषदेचे सूप वाजेल, अशी माहिती आहे.
वनमंत्र्यांचा दौरा रद्द, वनपरिषदेचा आत्मा हरपला, राज्यभरातून वरिष्ठ वनाधिका-यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:19 PM