मनीष तसरे
अमरावती : शहरात १० टक्के श्वान कॅन्सरग्रस्त असण्याची शक्यता नुकत्याच दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पार्व्हो व्हायरसने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले होते. पाळीव श्वानांसोबतच रस्त्यावरील बेवारस श्वानांनासुद्धा हा रोग झाल्याचे आढळून आले. या साथीच्या आजारात अनेक बेवारस श्वान मृत्युमुखी पडले. आता अमरावती शहरात श्वान व मांजरींमध्ये कॅन्सर फोफावत आहे.
अमरावती शहरातून पाच श्वान दोन आठवड्यात वेगवेगळ्या परिसरातून वसा ॲनिमल्स रेस्क्यू टीमने उपचाराकरिता श्री गौरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल व वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटर येथे दाखल केले. अजून तीन कॅन्सरग्रस्त श्वानांची माहिती हेल्पलाईनला मिळाली आहे, अशी माहिती वसाचे गणेश अकर्ते यांनी दिली.
पाळीव श्वानांना सांभाळावे
श्वानांना होणारा कॅन्सर हा झुनेटिक नाही. त्यामुळे कॅन्सरग्रस्त श्वानांपासून मनुष्याला नाही, पण इतर पाळीव श्वानांना संभाव्य धोका आहे. सरासरी मध्यमवयीन आणि वृद्ध श्वानांमध्ये कॅन्सरची लागण झालेली आढळले आहे. कॅन्सरची लक्षण आढळल्यास तत्काळ सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा वसाच्या सेंटरला संपर्क साधण्याचे आवाहन वसाचे भूषण सायंके यांनी दिली.
प्राण्यांमध्ये होणारा कॅन्सर त्रासदायक
प्राण्यांची योग्य वयात नस बंदी न केल्यामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे शरीरात अनेकदा हार्मोनल Imbalance झालेले आढळते.
त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर झालेले आढळून येतात. बऱ्याच मादी श्वानाची पिले मरून जातात तेव्हा त्याच्या स्तनांमध्ये दुधाच्या गाठी निर्माण होतात. समोर त्याच गाठी मॅमरी ग्लँड ट्यूमरचे रूप घेतात. ट्यूमरची शस्त्रक्रिया करून तो काढणे शक्य आहे. सोबतच किमोथेरपीनेसुद्धा कॅन्सर ठीक केला जातो.
प्राण्यांमध्ये आढळणारे कॅन्सरचे प्रकार
मेलॅनोमा
ऑस्टिओसर्कोमा
लंग कॅन्सर
मास्ट सेल ट्यूमर
लिम्फोमा
मॅमरी कॅन्सर
हिमॅनजिओसर्कोमा
प्रोस्टेट कॅन्सर
ब्लड कॅन्सर
उपचाराने बरा होऊ शकतो कॅन्सर
श्वानांमध्ये मुख्यत: सात प्रकारचे कॅन्सर आढळून येतात. त्या पैकी काही बेनिंग म्हणजे न पसरणारे, तर काही मॅनिगनंट म्हणजे पसरणारे असतात. सध्या आमच्याकडे कॅन्सरच्या उपचाराकरिता पाच प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये मॅमरी ग्लँड ट्यूमर, ट्रान्समिसिबल व्हिनरल ट्यूमर (टीव्हीटी) झालेले श्वान आहेत. पैकी एका मादी श्वानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार श्वानावर आम्ही वसामध्ये उपचार करीत आहोत.
- डॉ. कल्याणी तायडे, व्हेटर्नरी सर्जन, वसा अनिमल्स रेस्क्यू सेंटर.
कॅन्सर हा प्राण्यांमध्ये आढळून येतो. तो शस्त्रक्रियेद्वारे बरा होऊ शकतो. वेळोवेळी लसीकरण व काळजी घेणे गरजेचे आहे. आमच्याकडे गेल्या दोन आठवड्यात दोन श्वानांवर उपचार करण्यात आले. तथापि, वयोवृद्ध श्वानांवर किमो करता येत नाही.
डॉ. राजीव खेरडे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन
घातक टीव्हीटीला नसबंदी हा उपचार
आम्ही मागील महिन्यात १४ श्वान आणि दोन मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया वसा सेंटरवर केली आहे. बेवारस श्वान, मांजरांची नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास त्यांच्यामध्ये टीव्व्टी पसरणार नाही. प्राण्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेची सुविधा वसा ॲनिमल्स रेस्क्यू सेंटरमध्ये उपलब्ध आहे.
- शुभमनाथ ग. सायंके (सहाय्यक पशुचिकित्सक, वसा संस्था, अमरावती)
अशी घ्या काळजी
१. पाळीव श्वानांना रस्त्यावर एकटे सोडू नका.
२. बाहेरील श्वानांसोबत मेटिंग होऊ नये, याकरिता योग्य वयात त्यांचे नसबंदी ऑपरेशन करून घ्या.
३. बाहेरून फिरून आल्यावर श्वानाचे चांगले हातपाय स्वच्छ करा.
४. स्तनावर, शरीरावर कुठेही गाठ वाटत असेल, तर त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.
५. श्वान, मांजरीच्या लघवीच्या जागेतून रक्तमिश्रित पाणी किंवा रक्त निघत असेल, तर दुर्लक्ष करू नका.
६. प्राण्यांमधील कॅन्सरचा योग्य वेळेत उपचार झाल्यास त्याला पूर्णपणे बरे केले जाऊ शकते.