लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : निवडणुकीसाठी मंगळवारी विधानसभा (दि.२२) पासून उमेदवारी अर्जाला सुरुवात होत आहे. अर्ज सादर करताना उमेदवारासह केवळ पाच जणांनाच कक्षात प्रवेश राहणार आहे तर १०० मीटर आवारात तीन वाहनांना प्रवेश राहणार असल्याने अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी दुपारी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामाचा दूर दृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. सरमिसळ केल्यानंतर मतदानयंत्र संबंधित विधानसभा क्षेत्रात आजपासून पाठविण्यास सुरुवात करण्यात आली.
अमरावती आणि बडनेरा मतदारसंघाच्या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येत असलेल्या कार्यालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. अमरावती मतदारसंघासाठी तालुका प्रशासकीय भवनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना योग्य त्या सुविधा देण्यात याव्यात. खर्च आणि परवानग्यांची योग्य माहिती देण्यात यावी. उमेदवारांना अर्ज, नमुने आणि आवश्यक त्या सूचना एकाचवेळी देण्यात याव्यात. परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही कटियार यांनी दिले. विधानसभा निवडणूकीचे अनुषंगाने राजकीय वातावरणही तापणार आहे.
निवडणूक कार्यक्रम उमेदवारी अर्ज स्वीकृती : २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्जाची छाननी : ३१ ऑक्टोबर उमेदवारी अर्जाची माघार : ०४ नोव्हेंबर उमेदवारी चिन्ह वाटप : ०४ नोव्हेंबर मतदान : २० नोव्हेंबर मतमोजणी : २३ नोव्हेंबर
प्रत्येक मतदारसंघात २५ टक्के अधिक इव्हीएम जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत २७०८ मतदान केंद्र राहणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांच्या २५ टक्के अधिक मतदान यंत्र उपलब्ध झाले आहे. मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी केली आहे. ही मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे. सरमिसळनंतर या मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप आजपासून लोकशाही भवनातून सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघाला २० टक्के अधिक मतदान यंत्रे वाटप करण्यात आली आहेत.