नेर (यवतमाळ) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील एका उमेदवाराने चक्क बनियनवर मतदान केंद्रावर प्रवेश करून खळबळ उडवून दिली. नेर येथील तहसील कार्यालय मतदान केंद्रावर पोहोचलेल्या या शिक्षक असलेल्या उमेदवाराने यासंदर्भातील आपली भूमिकाही लोकांसमाेर मांडली. विनाअनुदानित शिक्षकांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. उल्हास पाटील (रा.कारली, ता.मानोरा, जि.वाशिम) असे या उमेदवाराचे नाव आहे.
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान सुरू असताना उल्हास पाटील हे मतदान केंद्राचे परिक्षण करण्यासाठी तहसील कार्यालयातील केंद्रावर धडकले. फुलपँट आणि बनियनवर धडकलेल्या या उमेदवाराला पाहून प्रशासनाची धावपळ सुरू झाली, तर बघ्यांची गर्दी जमली. शासनाचा निषेध करण्यासाठी आज मतदानाच्या दिवशी बनियनवर राहुनच आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे उल्हास पाटील म्हणाले.
कार्ली येथील विनाअनुदानित विद्यालयात कार्यरत असताना मागील १७ वर्षांपासून पगार मिळाला नाही. गेली चार वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करत आहे. विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न शासनाकडे मांडत गेलो. मात्र केवळ आश्वासने मिळाली. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात आहो, पण शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी या भूमिकेत मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी आल्याचे उल्हास पाटील म्हणाले.